रत्नागिरी :दादर-रत्नागिरी-मडगाव ही एकच रेल्वे पॅसेंजर, विभागीय व्यवस्थापकांचा खुलाशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:34 PM2018-09-21T15:34:42+5:302018-09-21T15:47:55+5:30
रत्नागिरी - दादर - रत्नागिरी ही पॅसेंजर रेल्वे गेल्या तीन वर्षांपूर्वीच मडगावपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. त्यामुळे ही गाडी आता दादर - रत्नागिरी - मडगाव अशीच सुरू आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी - दादर - रत्नागिरी ही पॅसेंजर रेल्वे गेल्या तीन वर्षांपूर्वीच मडगावपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. त्यामुळे ही गाडी आता दादर - रत्नागिरी - मडगाव अशीच सुरू आहे. मात्र, मडगावहून रत्नागिरीत येताना व रत्नागिरीतून दादरला जाताना या गाड्यांचे नंबर बदलले जातात, अशी माहिती कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी-दादर - रत्नागिरी अशी रत्नागिरी स्थानकातून स्वतंत्र पॅसेंजर गाडी सोडली जात होती. त्यामुळे रत्नागिरी पॅसेंजरची स्वतंत्र फेरी रद्द होऊन ती दादर-मडगाव झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्याबाबत कोकण रेल्वेकडे विचारणा केली असता रत्नागिरी-दादर स्वतंत्र गाडी आहे व रत्नागिरी-मडगाव वेगळी फेरी आहे, असा युक्तिवाद सातत्याने केला जात होता. मात्र, आता ही गाडी स्वतंत्र नाही, हे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापकांच्या खुलाशानंतर स्पष्ट झाले आहे.
सध्याच्या पावसाळ्यात कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षितता मिळावी, गणेशोत्सवातील जादा गाड्यांचे नियोजन योग्यरित्या व्हावे व मुंबईकरांचा कोकण दौरा सुखकर, सुरक्षित व्हावा, यासाठी मार्गावर सर्वत्र दिवस-रात्र कर्मचाऱ्यांनी नजर ठेवली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गणेशोत्सवाकडे लक्ष न देता युद्धपातळीवर मार्ग सुरक्षिततेचे काम केले आहे. त्यामुळेच पावसाळ्यात व गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेकडून प्रवाशांना चांगली सेवा पुरविणे शक्य झाल्याचे शेंड्ये म्हणाले.
मार्ग सुरक्षेवर ८०० कोटी खर्च
गेल्या दहा वर्र्षांपासून कोकण रेल्वे सातत्याने फायद्यात आहे. यंदाही कोकण रेल्वेचा फायदा दीडशे कोटींच्या जवळपास आहे. मात्र, दरवर्षी होणाऱ्या फायद्यातील ९० टक्के रक्कम कोकण रेल्वे मार्गाच्या सुरक्षिततेवर खर्च केली जात आहे. गेल्या १० वर्षांच्या काळात कोकण रेल्वेमार्गावरील दरडी कोसळण्याचे प्रमाण संपुष्टात आले आहे. दरडी कोसळू नयेत, यासाठीच्या उपाययोजनांवर आतापर्यंत सुमारे ८०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे शेंड्ये म्हणाले.
गुटख्याच्या पिचकाऱ्या
स्वच्छता सप्ताहच्या पार्श्वभूमीवर माहिती देताना कोकण रेल्वेचे काही कर्मचारी गुटखा खाऊन त्याच्या पिचकाऱ्या स्थानकांमध्ये, कार्यालयाच्या आवारात मारीत असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत नक्की दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे शेंड्ये म्हणाले.
स्वच्छता पंधरवडा
१७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत रेल्वेमार्ग, रेल्वे गाड्या तसेच रेल्वे स्थानके यांची स्वच्छता केली जाणार आहे. रेल्वे स्थानके व रेल्वेमध्ये स्वच्छता राखणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. त्याबाबतही प्रबोधन केले जाणार आहे.