तब्बल तीन महिन्यांनी रत्नागिरीची डाळ शिजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 04:25 PM2018-09-22T16:25:48+5:302018-09-22T16:29:41+5:30
तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि गणेशोत्सव संपल्यानंतर राज्य सरकारने रेशन दुकानावर तूरडाळ उपलब्ध करून दिली आहे. ३५ रूपयात तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा झाल्यानंतर चार महिन्यांनी प्रत्येक रेशन काडार्साठी एक किलो याप्रमाणे तूरडाळ जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे.
रत्नागिरी : तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि गणेशोत्सव संपल्यानंतर राज्य सरकारने रेशन दुकानावर तूरडाळ उपलब्ध करून दिली आहे. ३५ रूपयात तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा झाल्यानंतर चार महिन्यांनी प्रत्येक रेशन काडार्साठी एक किलो याप्रमाणे तूरडाळ जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यासाठी पुरवठा विभागाला तीन महिन्यांची ८,३८९ क्विंटल तूरडाळ प्राप्त झाली आहे. एप्रिलपासून डाळीच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेचा गणेशोत्सवही कोरडाच गेला. राज्याच्या पुरवठा विभागाकडून एप्रिल महिन्यात रास्तदर दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना ३५ रुपए दराने तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती.
घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात ही डाळ जून महिन्यात आली. शिधापत्रिकेप्रमाणे अर्धा किलो डाळ वितरीत करण्याचा निर्णय असला तरी अपुरा पुरवठा झाल्याने काहींना २०० ग्रॅम डाळ वितरीत करावी लागली.
त्यातच दापोली येथे ३५ऐवजी ५५ रुपए किलो दराने डाळ विकल्याने गोंधळ अधिकच वाढला. हे दर कमी करून मिळावा, यासाठी आमदार संजय कदम यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. आता पुरवठा विभागाच्या जुलै महिन्याच्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी २८३५ क्विंटल तूरडाळ उपलब्ध झाली आहे. मात्र, ही तूरडाळही गणेशोत्सवानंतर आली आहे.
प्रतिशिधापत्रिका एक किलो ३५ रुपए दराने देण्याची सूचना पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे. याचबरोबर आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या मागणीनुसार या दोन महिन्यांसाठी प्रत्येकी २७७७ क्विंटल तूरडाळही पुरवठा विभागाला प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे श्वेत शिधापत्रिकाधारकांनाही ही डाळ खरेदी करता येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात ही डाळ मिळाली असती तर सण आणखी उत्साहात गेले असते, असे शिधाधारकांचे म्हणणे आहे.
ऐन गणेशोत्सवात शिधापत्रिकाधारकांसाठी रास्तदर धान्य दुकानांमध्ये तूरडाळ उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आता दसरा आणि दिवाळीसाठी डाळ उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दसरा - दिवाळीत तूरडाळीप्रमाणे साखरही मिळाल्यास हे सण गोड होतील, अशी आशा व्यक्त होत आहे.
मागणीपेक्षा अधिक उपलब्ध
जून महिन्यात तूरडाळीची अपुरा पुरवठा झाला होता. तसेच दापोलीला ही डाळ ५५ रूपयाने खरेदी करावी लागली होती. त्यामुळे ज्या शिधापत्रिकाधारकांना ही डाळ या दराने घ्यावी लागली, त्यांच्याकरिता फरकाची डाळही यात समाविष्ट करण्यात आल्याने जुलैच्या मागणीपेक्षा अधिक डाळ यावेळी उपलब्ध झाली आहे.