रत्नागिरी विभागाला तब्बल २ कोटींचा तोटा

By admin | Published: April 17, 2016 10:45 PM2016-04-17T22:45:38+5:302016-04-17T23:55:48+5:30

परिवहन महामंडळ : खासगी वाहतुकीने एस. टी.चे कंबरडे मोडले

Ratnagiri Department's loss of 2 crores | रत्नागिरी विभागाला तब्बल २ कोटींचा तोटा

रत्नागिरी विभागाला तब्बल २ कोटींचा तोटा

Next

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला (२०१५-१६)मध्ये २८० कोटी १२ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. ग्रामीण भागातील वाडीवस्तीवर पोहोचलेल्या एस. टी.ला ‘जीवनवाहिनी’ म्हणून संबोधले जाते. खासगी वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांचा तिकडे अधिक ओढा आहे. त्यामुळे खासगी वाहतुकीशी एस. टी.ला सातत्याने स्पर्धा करावी लागत आहे. गतवर्षी रत्नागिरी विभागाला २८३ कोटी १ लाख ४९ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीपेक्षा यावर्षी रत्नागिरी विभागाला तब्बल २ कोटी १७ लाखांचा तोटा झाला आहे.
अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी महामंडळाने पोलीस, परिवहन कार्यालयामार्फत व्यापक मोहीम राबविली होती. तरीही रत्नागिरी विभागाला आर्थिक तोटा सोसावा लागत आहे. रत्नागिरी विभागामध्ये आठशे गाड्या असून, दररोज २ लाख २५ हजार किलोमीटर इतकी वाहतूक करण्यात येते. त्यासाठी प्रतिदिन किमान ५३ हजार लीटर डिझेलचा वापर होतो. विभागात एकूण १७३८ चालक असून, १५५५ वाहक कार्यरत आहेत. दररोज नऊ हजार फेऱ्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरु आहे. खासगी वाहतुकीचा एस. टी.च्या उत्पन्नावर परिणाम होत असला, तरी रत्नागिरी विभागातर्फे ‘मागेल त्याला गाडी’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली. तसेच ‘प्रवासी वाढवा’ अभियानांतर्गत अधिकाधिक प्रवासी वाहतूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
निवडणुका, यात्रोत्सव, सहली, लग्नसराई यामुळे एस. टी.ला अधिकचे उत्पन्न प्राप्त होत आहे. कोकण रेल्वेची सेवा ठप्प झाल्यास एस. टी.चे सहाय्य घेण्यात येते. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी संबोधली जाणारी एस. टी. वाडीवस्तीवर जावून पोहोचली आहे. अनेकवेळा कमी भारमानातही एस. टी. वाडीवस्तीवर जात असल्यामुळे महामंडळाचे नुकसान होते. इंधनदरात वर्षभरात सातत्याने वाढ झाली तरीही महामंडळाची त्यामानाने तिकीटवाढ न झाल्याने परिणामी एस. टी.च्या उत्पन्नात घट झाली आहे. यापूर्वी दि. २२ आॅगस्ट २०१४ रोजी नियमीत भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर इंधनाचे दरातील चढ-उतार विचारात घेता महामंडळाने तिकीट दर स्थिर ठेवले होते. मात्र, दिवाळीच्या सुटीत सहलीसाठी व पर्यटनासाठी जाणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेतातोटा भरुन काढण्यासाठी वीस दिवसांकरिता हंगामी भाडेवाढ दि. ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजनेच्या अंमलबजावणीला दिनांक १ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला आहे. याद्वारे प्रत्येक तिकीटामागे एक रूपयाची वाढ करण्यात आली आहे. यावर्षी उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी रत्नागिरी विभाग नेमकी काय उपाययोजना करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)

हंगामापुरता.. : गर्दीच्या हंगामात तोटा होतो कमी...
एस. टी.चे बिघडलेले वेळापत्रक आणि अन्य कारणांमुळे एस. टी.कडील प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळला आहे. खासगी वाहतूकदारांना एस. टी.वरील नाराजीचा चांगलाच फायदा मिळाला आहे. गर्दीच्या हंगामात एस. टी.ने जादा गाड्या सोडल्या की, रत्नागिरी विभागाला होणारा तोटा तेवढ्यापुरता कमी होतो. मात्र, त्यानंतर वर्षभरातील अन्य हंगामात पुन्हा हा तोटा वाढतो.

मानसिकताच नाही
एस. टी. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची महामंडळ फायद्यात यावे, अशी मानसिकता नसल्यानेच तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवासी आपल्याकडे वळावा, यासाठी कोणताही प्रयत्न न करणारे कर्मचारी प्रवाशांना सौजन्याची वागणूकही देत नसल्याने प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळला आहे.

Web Title: Ratnagiri Department's loss of 2 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.