राजकारणापेक्षा भूमीचा विकास करा : राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 05:56 PM2018-05-26T17:56:54+5:302018-05-26T18:26:37+5:30
कोकण ही नररत्नांची खाण आहे. त्यातील अनेक रत्ने ही रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे या भूमीला एक वेगळी उंची आहे. अशा या भूमीमध्ये आपण काम करीत असल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे. प्रत्येकवेळी राजकारण करण्यापेक्षा राजकारणापलिकडे जाऊन या भूमीचा विकास करा, असा मौलिक सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवरूख येथील बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांना दिला.
देवरूख : कोकण ही नररत्नांची खाण आहे. त्यातील अनेक रत्ने ही रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे या भूमीला एक वेगळी उंची आहे. अशा या भूमीमध्ये आपण काम करीत असल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे. प्रत्येकवेळी राजकारण करण्यापेक्षा राजकारणापलिकडे जाऊन या भूमीचा विकास करा, असा मौलिक सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवरूख येथील बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांना दिला.
शहरातील द्रौपदी इन हॉटेलच्या सभागृहात आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे यांनी २२ मेपासून कोकण दौऱ्याला प्रारंभ केला आहे.
शुक्रवारी ठाकरे हे देवरूखनगरीत आले होते. यावेळी ठाकरे यांनी प्रथम देवरूखची ग्रामदेवता श्री सोळजाई देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर झालेल्या बैठकीत तालुका कार्यकारिणी कशाप्रकारे करावी, याबाबत त्यांनी सूचना दिल्या. आपल्याला अपेक्षित असलेले काम सांगून त्यांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, पक्षवाढीसाठी प्रयत्न करावा, असे सांगितले. त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे स्पष्ट केली.
बैठकीला माजी आमदार नितीन सरदेसाई, नेते शिरीष सावंत, राज्य सरचिटणीस व कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण, उपाध्यक्ष सत्यवान दळवी, जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, संजय नाईक, मनोेज हाटे, संगमेश्वर तालुका संपर्कप्रमुख श्रीपत शिंदे, शहराध्यक्ष अनुराग कोचिरकर, सागर संसारे, नगरसेविका सान्वी संसारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते