रत्नागिरी : धनगर प्रतिनिधी ७० वर्षात प्रथमच जिल्हा नियोजन समितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 04:34 PM2019-01-02T16:34:29+5:302019-01-02T16:35:56+5:30
स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय इतिहासात जिल्ह्यात प्रथमच पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी धनगर समाजातील तुकाराम येडगे यांना जिल्हा नियोजन समितीवर घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात एक नवा पायंडा घालून दिला.
देवरूख :स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय इतिहासात जिल्ह्यात प्रथमच पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी धनगर समाजातील तुकाराम येडगे यांना जिल्हा नियोजन समितीवर घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात एक नवा पायंडा घालून दिला.
देश स्वतंत्र होऊन ७० वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला. या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात धनगर समाजात अनेक कर्तृत्ववान कार्यकर्ते तयार झाले, त्यांनी समाज संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित समाज जडणघडणीची चळवळ कार्यरत ठेवली. मात्र, लोकशाही प्रक्रियेत आवश्यक असलेल्या लोकप्रतिनित्व करणाऱ्या पदावर काम करण्याची संधी कोणत्याही कार्यकर्त्याला मिळाली नव्हती. त्याहीपेक्षा राजकीय पक्षांनी ती दिली नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक धनगरवाड्या आजही मूलभूत समस्यांपासून वंचित आहेत. राज्य शासनाकडून अपेक्षित असलेल्या रस्ता, पाणी सुविधाही मिळू शकल्या नाहीत. धनगर समाजाच्या समस्या जिल्हास्तरावर आक्रमकतेने मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याने धनगर समाजातील कर्तृत्ववान कार्यकर्त्याला जिल्हा नियोजन समितीसारख्या समितीवर घेणे क्रमप्राप्त ठरत होते. या सर्व बाबींचा विचार करुन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी तुकाराम येडगे यांना संधी दिली.
जिल्ह्यातील धनगरवाड्यांच्या विकासासंदर्भात जिल्हा नियोजनमधून विशेष बाब निधीला मान्यता देऊन येडगे यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झाल्यानंतर २९ डिसेंबर २०१८ रोजी जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री वायकर यांनी २०१९च्या आर्थिक वर्षाकरिता १६५ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता दिली.
या निधीमधून जिल्ह्यातील धनगरवाड्यांसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करण्यात येणार असून, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री वायकर यांनी या ठरावाला अधिकृत मान्यता दिली. धनगरवाड्यांसाठी विशेष बाब म्हणून निधी देण्याच्या सूचनांचे रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी कौतुक केले. धनगरवाड्यांच्या समस्या सोडवणे आवश्यक असल्याचे यावेळी खासदार राऊत म्हणाले.
रत्नागिरीचे पालकमंत्री वायकर, शिवसेना सचिव तथा रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत, जिल्ह्यातील आमदार व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक काम करत असून, नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार माझी सामाजिक चळवळ सुरु ठेवणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, जिल्हा नियोजन समितीच्या ठरावानुसार धनगरवाड्यांच्या विकासासाठी मान्यता दिलेल्या विशेष बाब निधीसाठी पाठपुरावा करणार आहे, असे ते म्हणाले. धनगर समाजातील विविध संघटना आणि समाजातील पदाधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने आपला आजपर्यंतचा प्रवास यशस्वी झाला.
आगामी काळात काम करत असताना शिवसेना शाखाप्रमुखांपासून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्वच पातळीवर विश्वासाने काम करणार असून, पालकमंत्री वायकर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी लावणार असल्याचे तुकाराम येडगे यांनी यावेळी सांगितले.