रत्नागिरी जिल्ह्यात
By admin | Published: November 2, 2016 11:21 PM2016-11-02T23:21:52+5:302016-11-02T23:21:52+5:30
एकाचा निर्णय प्रलंबित : आता प्रतीक्षा माघारीची
रत्नागिरी : जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगरपरिषदांची आणि दापोली नगरपंचायतीची निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांसाठी दाखल झालेल्या एकूण ४९६ अर्जांपैकी ४८२ अर्ज वैध ठरले असून, एकाबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात नगरसेवक पदासाठीचे १० अर्ज अवैध ठरले असून, एका अर्जाचा निर्णय प्रलंबित आहे, तर नगराध्यक्ष पदासाठी दाखल अर्जांपैकी तीन अर्ज बाद झाले आहेत.
रत्नागिरीमध्ये नगरसेवकांच्या ३० जागांसाठी एकूण १२० अर्ज आले होते. त्यापैकी नऊ अर्ज अवैध ठरले असून, १११ अर्ज वैध ठरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी १२ पैकी तीन अर्ज अवैध ठरले असून, नऊ अर्ज वैध ठरले आहेत.
चिपळूणमध्ये नगरसेवकांच्या २६ जागांसाठी ११३ अर्ज, तर नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज दाखल झाले होते. हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत.
खेडमध्ये नगरसेवकांच्या १७ जागांसाठी ६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी बुधवारी ६२ अर्ज वैध ठरले असून, एका अर्जाचा निकाल काही कारणास्तव राखून ठेवण्यात आला आहे. तसेच नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत.
दापोली नगरपंचायतमध्ये १७ जागांसाठी १०८ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीवेळी एक अर्ज अवैध ठरला असून, उर्वरित १०७ अर्ज वैध ठरले आहेत. राजापुरात १७ नगरसेवकांच्या जागांसाठी ६६ आणि नगराध्यक्षाच्या जागेसाठी तीन, असे एकूण ५२ उमेदवारांचे ६९ अर्ज आले होते. बुधवारी हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत.
जिल्ह्यातील चार नगरपरिषदांच्या नगरसेवकांच्या १०७ जागांसाठी आलेल्या ४७३ अर्जांपैकी ४५९ अर्ज वैध ठरले असून, १० अर्ज अवैध ठरले आहेत. खेडमधील एका अर्जाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. तसेच नगराध्यक्षांच्या चार जागांसाठी आलेल्या एकूण २६ अर्जांपैकी २३ अर्ज वैध, तर तीन अर्ज अवैध ठरले आहेत.
बुधवारी छाननीअंती वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली. ११ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने निवडणुकीच्या रिंगणातून कोण माघार घेणार आणि कोण लढणार, हे स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)