Ganeshotsav रत्नागिरी जिल्हा : ११० सार्वजनिक गणेशमूर्तीही स्थानापन्न होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 06:21 PM2018-09-10T18:21:25+5:302018-09-10T18:23:25+5:30
भक्तगणांच्या लाडक्या गणपतीबाप्पांचे आगमन गुरूवार, १३ रोजी सर्वत्र होणार आहे. जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३५७ घरगुती तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
रत्नागिरी : भक्तगणांच्या लाडक्या गणपतीबाप्पांचे आगमन गुरूवार, १३ रोजी सर्वत्र होणार आहे. जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३५७ घरगुती तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सध्या पाऊस सरीवर कोसळत आहे. पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिल्यामुळे शनिवारी रत्नागिरीतील आठवडा बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामध्ये ग्रामीण भागातून शहरात खरेदीसाठी आलेल्यांची संख्या अधिक होती.
श्रावण संपल्यानंतर भाद्रपद चतुर्थीला गणेशोत्सवाला प्रारंभ होतो. घरोघरी गणेशमूर्ती घरी आणून त्यांची विधीवत पूजा केली जाते. जिल्ह््यात घरोघरी गणेशमूर्ती आणण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. शिवाय ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. दिनांक १२पासून शाळा, व महाविद्यालयांना गणेशोत्सवाची सुटी मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाण कमी असले तरी घरोघरी गणेशमूर्ती आणून पूजा करण्यात येते. मुंबईकर मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी दरवर्षी गावी येत असतात.
मुंबई व उपनगरातील आगारातून जादा एस. टी. बसेस सोडण्यास प्रारंभ झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथून कोकणात २ हजार २२५ जादा गाड्यांतून मुंबईकर येणार असून सर्वाधिक जादा गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत.
याव्यतिरिक्त रत्नागिरी विभागातून नियमित १५० गाड्या सुरू असून, गणेशोत्सवासाठी दररोज ८० गाड्या सोडण्यात येत आहेत. याशिवाय परतीच्या प्रवासासाठी देखील रत्नागिरी विभागाने १५०० जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांव्यतिरिक्त गणपती स्पेशल गाड्या धावत आहेत. त्याबरोबरच खासगी ट्रॅव्हल्स, अन्य छोट्या-मोठ्या खासगी गाड्यांतून मुंबईकरांचे आगमन सुरू झाले आहे. काही शाळांना मंगळवारपासून तर काही शाळांना बुधवारपासून सुटी सुरू होणार आहे. त्यामुळे बाजारात व महार्गावर सर्वाधिक गर्दी ही मंगळवार तसेच बुधवारी उसळण्याची शक्यता आहे. यादिवशी बसेस तसेच रेल्वेनेही जादा सोडल्या आहेत.
काही शाळांनी १७ तारखेपर्यंत तर काही शाळांनी १८ सप्टेंबरपर्यत सुटी घोषित केल्याने अनेक मंडळी सोमवारची रजा टाकून शनिवारपासूनच गावाकडे निघाली आहेत. शासकीय, निमशासकीय सेवेत कार्यरत असणारी मंडळीदेखील शाळा, कॉलेजमध्ये मुलांना सुटी असल्याने कुटुंबियांसमवेत गावी निघाल्याने लांबपल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागातील गाड्यांना प्रचंड गर्दी झाली आहे.