रत्नागिरी जिल्ह्यात कमी पटसंख्येच्या ६५० शाळा बंद होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:17 PM2018-09-30T23:17:35+5:302018-09-30T23:17:39+5:30

In Ratnagiri district, 650 schools of lesser population will be closed? | रत्नागिरी जिल्ह्यात कमी पटसंख्येच्या ६५० शाळा बंद होणार?

रत्नागिरी जिल्ह्यात कमी पटसंख्येच्या ६५० शाळा बंद होणार?

googlenewsNext

रत्नागिरी : कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील सुमारे ६५० प्राथमिक शाळा चालू शैक्षणिक वर्षामध्ये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये सप्टेंबर अखेर पटसंख्या निश्चितीनंतर या शाळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या सर्व शाळा बंद करण्यात येणार नसल्या, तरी कमी पटसंख्येच्या नावाखाली चालू शैक्षणिक वर्षात शेकडो शाळा बंद करुन तेथील मुलांचे अन्य जवळच्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित शाळांमधील शिक्षकवर्गातही अस्वस्थता पसरली आहे.
जिल्हा परिषदेच्या २ हजार ६२१ प्राथमिक शाळा असून, त्यामध्ये सुमारे ७ हजार ५०० शिक्षक अध्यापनाचे धडे देत आहेत. या शाळांमध्ये ० ते १० पटसंख्येच्या सुमारे ६५० प्राथमिक शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सोयीसुविधा देण्यात येतात. तसेच या शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमही राबविले जात आहेत. त्याचबरोबर शिक्षकांनाही वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरीही खासगी शाळांकडे पालकांचा वाढता ओघ चिंतेची स्थिती निर्माण करणारा आहे़
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मार्च-एप्रिल महिन्यादरम्यान प्रत्येक तालुक्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा तसेच स्थलांतरीत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येतो़ दरवर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असल्याने पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांना सतत आटापिटा करावा लागतो़ पटसंख्या कमी झाल्यास शिक्षकांनाही अतिरिक्त ठरण्याची भीती सतत जाणवत असते़ त्यामुळे पटसंख्येअभावी शाळा बंद होऊ नये, यासाठी शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांची शोधमोहीम सतत सुरु असते़ ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाहूनच शिक्षकांची निश्चिती करण्यात येते़ त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षामध्ये किती शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत, हे आता लवकरच समजणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची घसरलेली पटसंख्या ही शिक्षकांसाठी चिंतेचे बाब बनत चालली आहे. आरटीई कायद्यानुसार कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळांना कुलूप लावण्याची वेळ आली आहे. मागील शैक्षणिक वर्षामध्ये पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या ८८ शाळा बंद करण्यात आल्या होत्या. यंदाही पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्यात येणार असल्याचे निश्चित आहे. कमी पटसंख्येमुळे शाळा बंद करण्यात आल्याने मागील शैक्षणिक वर्षात १६६ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असून, त्याला शिक्षक संघटनांकडून जोरदार विरोध सुरु आहे. शाळा बंद झाल्यास त्याचे परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे.

Web Title: In Ratnagiri district, 650 schools of lesser population will be closed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.