रत्नागिरी जिल्ह्यासाठी शनिवार घातवार , पाच अपघातात ८ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 07:02 AM2018-04-29T07:02:49+5:302018-04-29T07:02:49+5:30
जिल्ह्यासाठी शनिवार घातवारच ठरला. पाच वेगळवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात आठजण ठार झाले तर चारजण जखमी झाले. साखरपा येथे कार झाडावर आदळून चार जण तर खेरशेत
रत्नागिरी : जिल्ह्यासाठी शनिवार घातवारच ठरला. पाच वेगळवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात आठजण ठार झाले तर चारजण जखमी झाले. साखरपा येथे कार झाडावर आदळून चार जण तर खेरशेत (चिपळूण) येथे डंपरच्या धडकेने एका लहान मुलीसह तीन पादचारी महिला ठार झाल्या. त्याचदरम्यान खेड येथे जीपच्या धडकेने एका चार वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. त्याखेरीज अन्य दोन अपघातात चारजण जखमी झाले आहेत.
साखरपा येथे मारूती स्वीफ्ट कार झाडावर आदळून अमोल अजित जोशी व वैभव हेमंत डांगे हे जागीच ठार झाले तर नेहल हंमेत पाटील (३१) आणि समृद्धी अमोद जोशी (२७) यांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे सर्वजण डोंबिवली येथील असून, ते कणकवलीला जात होते. पुणेमार्गे ते आंबा घाटातून येत असताना हा अपघात झाला.
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथे डंपरने एका मुलीसह अन्य तीन पादचारी महिलांना धडक दिली. त्यात गीता रामू किंजळकर (५०) या जागीच ठार झाल्या. जिया मंगेश किंजळकर (५) ही बालिका आणि सुनिता गंगाराम निवळेकर (५५ रा. तुरळ, सुवरेवाडी) या दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुलोचना शांताराम किंजळकर (५५) या किरकोळ जखमी झाल्या आहेत. भरणेनाका येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ मारूती सुपर कॅरी जीप मागे घेताना चार वर्षाच्या चिमुरड्याचा चाकाखाली सापडून मृत्यू झाला आहे. अर्णव सचिन सुतार (भरणे, ता. खेड) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.
संगमेश्वर येथे कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात साक्षी सहदेव पाताडे (४६, मालवण) ही महिला जखमी झाली तर लांजा येथे स्वीफ्ट गाडीला कंटेनरची धडक बसल्याने तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.