उत्तर रत्नागिरीत सेनेचा बुरुज लागला ढासळू
By admin | Published: October 27, 2014 11:31 PM2014-10-27T23:31:58+5:302014-10-27T23:32:20+5:30
विधानसभा निवडणूक : जिल्हा नेतृत्व बदलाची चर्चा
रत्नागिरी : उत्तर रत्नागिरीतील शिवसेनेचा बुरुज ढासळत चालल्याने त्याचा परिणाम भविष्यात होणाऱ्या निवडणुकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी उत्तर रत्नागिरीचे शिवसेनेचे जिल्हा नेतृत्व बदलाची चर्चा राजकीय गोटात सुरु झाली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात गुहागरवगळता किमान चार मतदार संघांमध्ये शिवसेना बाजी मारेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण या तिन्ही मतदार संघात गड राखले़ मात्र, दापोलीची शिवसेनेची जागा गेल्याने हा अंदाज फोल ठरला. गेल्या २५ वर्षांत दापोली शिवसेनेकडे असतानाही या निवडणुकीमध्ये आमदार सूर्यकांत दळवी यावेळी मात्र, सूर्याप्रमाणे तेज दाखवू शकले नाहीत.
चिपळूण तालुक्यावर शिवसेनेची पकड ढिली झाल्याचे विधानसभा निवडणुकीनंतर चित्र समोर आले आहे़ चिपळुणात राष्ट्रवादीचे मताधिक्य वाढलेले असतानाच शिवसेनेची पीछेहाट झाली़ कारण गुहागर आणि चिपळूण विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले़ त्याउलट चिपळूण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या संगमेश्वर तालुक्याने शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांना तारले़ अन्यथा शिवसेनेची ही जागाही धोक्यात होती़ उत्तर रत्नागिरीतील दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातही शिवसेना दिवसेंदिवस कमकुवत होत चालल्याचे दिसत आहे.
उत्तर रत्नागिरीमध्ये चिपळूण, खेड, गुहागर, दापोली आणि मंडणगड हे पाच तालुके येतात़ शिवसेनेच्या दोन जिल्हाप्रमुखांपैकी एक जिल्हाप्रमुख उत्तर रत्नागिरीसाठी आहे़ या निवडणुकीत विविध कारणांनी शिवसेनेची उत्तर रत्नागिरीत झालेली पीछेहाट भविष्यात होणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर त्याचे परिणाम दिसून येतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे़ त्यावर शिवसेनेने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा आगामी काळात शिवसेनेचे प्राबल्य आणखी कमी होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)