रत्नागिरी जिल्हा भाजपत येणार बदलाचे चक्रीवादळ ?, बाळ मानेंबाबत वाढती नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:48 PM2018-06-28T14:48:00+5:302018-06-28T14:51:48+5:30

केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला गेली काही वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात वारंवार पराभव पत्करावा लागला आहे. चिपळूण नगर परिषद आणि देवरूख नगर पंचायतीमधील यशाखेरीज अन्य निवडणुकांमध्ये भाजप अपयशी झाल्याने आता भाजपमध्ये जिल्हा नेतृत्त्व बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Ratnagiri district BJP will face change in hurricane? | रत्नागिरी जिल्हा भाजपत येणार बदलाचे चक्रीवादळ ?, बाळ मानेंबाबत वाढती नाराजी

रत्नागिरी जिल्हा भाजपत येणार बदलाचे चक्रीवादळ ?, बाळ मानेंबाबत वाढती नाराजी

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा भाजपत येणार बदलाचे चक्रीवादळ ?, बाळ मानेंबाबत वाढती नाराजीआगामी निवडणुकांपूर्वी होणार मोठ्या घडामोडी

मनोज मुळ्ये

रत्नागिरी : केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला गेली काही वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात वारंवार पराभव पत्करावा लागला आहे. चिपळूण नगर परिषद आणि देवरूख नगर पंचायतीमधील यशाखेरीज अन्य निवडणुकांमध्ये भाजप अपयशी झाल्याने आता भाजपमध्ये जिल्हा नेतृत्त्व बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अलिकडच्या काळात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रसाद लाड यांचे प्रस्थ वाढू लागले आहे.

गेली अनेक वर्षे बाळ माने म्हणजेच रत्नागिरी जिल्हा भाजप असेच समीकरण झाले आहे. एकतर तेच अनेक वर्षे जिल्हाध्यक्ष आहेत आणि मधल्या काळात झालेले अन्य जिल्हाध्यक्ष हे त्यांनीच पुढे आणलेले त्यांचे जवळचे सहकारी होते. पडत्या काळातही बाळ माने यांनी भाजपची धुरा सोडली नव्हती.

केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर मात्र जिल्हा भाजपमध्ये वाढ अपेक्षित धरली जात होती. मात्र, नगर परिषद, नगरपंचायतीत भाजपला माफक यश मिळाले. चिपळूण आणि देवरूख या दोन ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. त्यात देवरूखमध्ये राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीच विशेष पुढाकार घेतला होता. ही दोन ठिकाणे वगळता भाजपला मोठे यश मिळालेले नाही.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्येही भाजपला खूप मोठा पराभव पत्करावा लागला. जिल्हा परिषदेत एकही जागा न मिळालेल्या भाजपला पंचायत समितीमध्येही फारसे काही हाती लागले नाही. जिल्ह्यातील भाजपच्या या एकूणच पराभवांचा पक्षीय पातळीवर गांभीर्याने विचार केला जात आहे. त्यामुळेच अलिकडे रत्नागिरी जिल्ह्यात संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड यांचे दौरे वाढले आहेत.

महत्त्वाच्या निर्णयांमधील या दोन नेत्यांचा सहभाग वाढला आहे. ह्यपदवीधरह्ण निवडणुकीसाठी डावखरे यांच्या प्रचाराची मुख्य सुत्रे प्रसाद लाड यांच्याकडे होती आणि प्रचारप्रमुख म्हणून अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्यावर जबाबदारी होती. या दोघांनीही जिल्ह्यातील सर्व लोकांना सोबत घेतल्याचा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरला आहे. या निवडणुकीत बाळ माने बाजूलाच राहिले होते.



रत्नागिरीसाठी प्रसाद लाड?

भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात प्रसाद लाड हे नाव अधिक प्रकर्षाने पुढे येत आहे. रत्नागिरी जिल्ह्याकडे त्यांनी विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली असून, रत्नागिरी विधानसभा मतदार संघात २०१९मध्ये त्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी रत्नागिरी मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, या मतदार संघातील त्यांचे दौरेही अलिकडे वाढले आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनीच प्रमुख सुत्रे सांभाळली आहेत.



बाळ माने चिपळूणमधून लढणार?

अलिकडे भाजपसाठी चिपळूण हे महत्त्वाचे ठिकाण होऊ लागले आहे. आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा वर्धापन दिन बाळ माने यांनी चिपळूणमध्येच साजरा केला होता. चिपळूण नगर परिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर बाळ माने यांनी चिपळूण तालुक्याकडे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे २०१९मध्ये ते विधानसभा निवडणूक चिपळूण मतदार संघातून लढणार की काय, अशी चर्चा पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

जानेवारीत राजीनामा दिला होता?

जानेवारी महिन्यात राजेश सावंत यांना शिवसेनेतून भाजपमध्ये घेण्यात आले, तेव्हा प्रवेशाच्या दिवशीच त्यांच्याकडे रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या चार तालुक्यांचा जिल्हाध्यक्ष अशी जबाबदारी देण्यात येणार होती. मात्र, ही बाब समजल्यानंतर बाळ माने यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली.

इतकेच नाही तर मुंबईत असूनही प्रवेशाला उपस्थित न राहण्याची भूमिका घेतली. सकाळी ११ वाजता होणारा प्रवेशाचा कार्यक्रम सायंकाळवर ढकलावा लागला. अखेर हा बदल तूर्त टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राजीनाम्याची बाब कोठेही बाहेर आली नाही. मात्र, कार्यकर्त्यांमधील नाराजी वाढत असून, येत्या काही काळात हे बदल केले जाणार असल्याची चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये होत आहे.
 

Web Title: Ratnagiri district BJP will face change in hurricane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.