रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांनी केली थिबा राजवाड्याची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 04:26 PM2018-10-05T16:26:02+5:302018-10-05T16:28:17+5:30
रत्नागिरीचे भूषण असलेल्या थिबा राजवाड्याच्या दुरूस्तीचे तसेच सुशोभिकरणाचे काम कित्येक वर्षे रखडले असल्याने पर्यटकांना ही वास्तू पाहता येत नाही. याबाबतचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी त्याची तातडीने दखल घेत मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने बुधवारी राजवाड्याची पाहणी केली व तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
रत्नागिरी : रत्नागिरीचे भूषण असलेल्या थिबा राजवाड्याच्या दुरूस्तीचे तसेच सुशोभिकरणाचे काम कित्येक वर्षे रखडले असल्याने पर्यटकांना ही वास्तू पाहता येत नाही. याबाबतचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी त्याची तातडीने दखल घेत मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने बुधवारी राजवाड्याची पाहणी केली व तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
ब्रह्मदेशचा राजा थिबा याचे वास्तव्य असलेल्या या ऐतिहासिक वास्तुला देशातील तसेच परदेशातील हजारो पर्यटक दरवर्षी भेट देतात. या राजवाड्यात काही वर्षांपूर्वी शासकीय तंत्रनिकेतन सुरू होते. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यालय सुरू होते. त्यामुळे या राजवाड्याची पडझड झाली आहे. सध्या हा राजवाडा पुरातत्व विभागाकडे आहे. यात थिबाकालीन वस्तूंचे संग्रहालयही आहे. मात्र, दुरूस्ती सुरू असल्याने येणाऱ्या पर्यटकांना केवळ संग्रहालयच पाहता येते. राजवाडा पाहता येत नाही. गेल्या चार वर्षात दुरूस्तीचे काम कासवगतीनेच होत आहे.
डिसेंबर २०१६मध्ये म्यानमारचे (पूर्वीचे ब्रह्मदेश) उपराष्ट्रपती यु मॅण्ट स्यु व मुख्य लष्कर प्रमुख मीन हाँग अलार्इंग, म्यानमारचा भिक्खु संघ आणि थिबा राजाचे वंशज यांनी थिबा राज्याचे वास्तव्य असलेल्या या राजवाड्याची, बुद्ध विहार, तसेच थिबा राजा आणि त्याची राणी यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. यावेळी या वारसांनी थिबा राजवाड्याच्या सुशोभिकरणासाठी खर्च करण्याची तयारीही दर्शविली होती. मात्र, त्याचवेळी शासनाकडून मिळालेल्या निधीतून दुरूस्ती सुरू होती.
राजवाड्याच्या दुरूस्तीच्या कामाला चार वर्षे उलटून गेली आहेत. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या कामाची पाहाणी केली. या राजवाड्यातील प्रत्येक खोलीत जाऊन त्यांनी माहिती घेतली.
संबंधित विभागाची कानउघडणी
थिबा राजवाड्याच्या दुरूस्तीसाठी आधीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या कार्यकालात जिल्हा नियोजनमधून ४८ लाख रूपयांचा निधी देण्यात आला होता. त्यातून काम झाल्याचे संबंधित विभागाकडून दाखविण्यात आले होते. मात्र, प्रदीप पी. यांनी त्यावेळी पाहणी केली असता अतिशय निकृष्ट काम केल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधित विभागाची चांगलीच कानउघाडणी केली होती.