रत्नागिरी : मत्स्यालयातील अस्वच्छतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे तोशेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:32 PM2018-10-26T13:32:04+5:302018-10-26T13:33:51+5:30
रत्नागिरी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॉर्निंगवॉकच्या निमित्ताने शहरातील मत्स्यालय तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाला अचानक भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे येथील अधिकारी, कर्मचारी यांची तारांबळ उडाली. यावेळी या परिसरात अस्वच्छता दिसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
रत्नागिरी : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॉर्निंगवॉकच्या निमित्ताने शहरातील मत्स्यालय तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाला अचानक भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे येथील अधिकारी, कर्मचारी यांची तारांबळ उडाली. यावेळी या परिसरात अस्वच्छता दिसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
रत्नागिरीचेजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी मॉर्निंगवॉकच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या. बोर्डिंग रोड येथील अध्यापक महाविद्यालय तसेच फणशी परिसरातून परटवणेकडे चालत जाताना त्यांनी नगर परिषदेच्या खचलेल्या रस्त्याची पाहणी केली.
परटवणे येथील पुलाचे अनेक वर्षे काम न झाल्यामुळे त्याचे अद्याप उद्घाटन झालेले नाही. या पुलावर सदैव वाहतूककोंडी होते. भविष्यात जड वाहनांमुळे या पुलाला धोका पोहोचू नये, यासाठी हा पूल सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यानंतर त्यांनी खेडेकरवाडीतून पालकर हॉस्पिटल चौकात बंद असणाऱ्या पोलीस चौकीची दुरवस्था पाहिली व तेथून सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाला भेट दिली. रत्नागिरी जिल्ह्याचे हे प्रमुख कार्यालय असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छीमार ये-जा करत असतात.
या ठिकाणी असणारे खेकडा संवर्धन, कोळंबी प्रकल्प याची पाहणी करताना येणाऱ्या मच्छीमारांना ते कसे फायदेशीर ठरतील, या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या मॉर्निंगवॉकच्या निमित्ताने रत्नागिरी मत्स्यालयाला भेट देऊन तेथे असणारे विविध जातीचे मासे आणि देवमाशाची माहितीही घेतली.
या मत्स्यालयासंदर्भात त्यांनी पर्यटकांचा ओढा वाढावा, यासाठी आवश्यक त्या सूचना केल्यात्यानंतर मिऱ्या ते कोल्हापूर या महामार्गावरून जाताना शहरातील अनेकांनी टाकलेला कचरा त्यांना आढळून आल्याने त्यांनी स्वच्छतेसंबंधी अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे अनेकांची मात्र तारांबळ उडाली.
अस्वच्छतेबद्दल जिल्हाधिकारी नाराज...
शासनाने नुकताच स्वच्छता पंधरवडा राबवला. परंतु या कार्यालयाकडून स्वच्छता न झाल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. सर्वत्र शासनाकडून स्वच्छता पंधरवडा राबविला जात आहे. मात्र, अनेक शासकीय कार्यालयातून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या मार्निंग वॉकच्या निमित्ताने निदर्शनास आले आहे.