रत्नागिरी : खासगीपेक्षा जिल्हा परिषद शिक्षकांचा दर्जा चांगला : आंचल गोयल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 05:03 PM2018-09-06T17:03:16+5:302018-09-06T17:45:43+5:30

इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांंपेक्षा जिल्हा परिषद शिक्षकांचा दर्जा चांगला आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक कुठेही कमी नाहीत, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केला़

Ratnagiri: District Council teachers better than private: Anchal Goyal | रत्नागिरी : खासगीपेक्षा जिल्हा परिषद शिक्षकांचा दर्जा चांगला : आंचल गोयल

रत्नागिरी : खासगीपेक्षा जिल्हा परिषद शिक्षकांचा दर्जा चांगला : आंचल गोयल

googlenewsNext
ठळक मुद्दे खासगीपेक्षा जिल्हा परिषद शिक्षकांचा दर्जा चांगला : आंचल गोयलआदर्श शिक्षक पुरस्काराचे मान्यवरांच्याहस्ते वितरण

रत्नागिरी : शिक्षक, शिक्षण आणि पैसा यांची तुलना आपण कधी करु शकत नाही़ जे जास्त शुल्क घेतात, तेथे चांगले शिक्षण देऊ शकत नाहीत़ तसेच इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांंपेक्षा जिल्हा परिषद शिक्षकांचा दर्जा चांगला आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक कुठेही कमी नाहीत, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केला़

शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी गोयत बोलत होत्या़.

त्या म्हणाल्या, आई-वडिलांनंतर शिक्षक आदर्श आहेत़ तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी चार मूलमंत्र आहेत़ ते म्हणजे कठोर परिश्रम, सकारात्मक विचार, दृढनिश्चय आणि यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्न हे होय. आपल्यासमोर अडचण निर्माण झाल्यास या चार बाबी नेहमीच फॉलो करा, तुम्ही नेहमीच यशस्वी व्हाल, असा मंत्र गोयल यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना देऊन त्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनातील गोष्टींना उजाळा दिला.

ग्रामीण भागातील शिक्षकांबद्दल आपल्याला आदर आहे़ प्रत्येक शिक्षकाला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवितो त्याबद्दल अभिमान वाटायला पाहिजे़ तसेच शिक्षकांनी काम केल्यास देशाची पुढील पिढी घडणार आहे, असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला़.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी भूषविले़ यावेळी उपाध्यक्ष संतोष गोवळे, शिक्षण सभापती सहदेव बेटकर, बांधकाम व आरोग्य समिती सभापती विनोद झगडे, समाजकल्याण समिती सभापती प्रकाश रसाळ, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी साधना साळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, सदस्य उदय बने, कोकण विभागीय मंडळ अध्यक्ष रमेश गिरी, शिक्षणाधिकारी देवीदास कुल्लाळ, शिक्षक नेते विकास नलावडे, संतोष कदम, बाबाजी शिर्के, दिलीप देवळेकर, चंद्रकांत पावसकर आणि सर्व सभापती उपस्थित होते़.

सुहास गुणाजी रांगले (मंडणगड), सुभाष सहदेव काताळकर (दापोली), संतोष दत्ताराम जाधव (खेड), संजय गोकुळ सोनावणे (चिपळूण), रवींद्र रामचंद्र कुळ्ये (गुहागर), प्रकाश धोंडू गेल्ये (संगमेश्वर), मैथिली संदेश लांजेकर (रत्नागिरी), सुहास रमाकांत वाडेकर (लांजा), तानाजी नारायण मासये (राजापूर) यांना गौरविण्यात आले़.

कामगिरीवर शिक्षक

जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना कामगिरीवर काढण्यात आल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ त्यासाठी शिक्षकांची कामगिरी थांबवा, अशी मागणी शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये केली़

Web Title: Ratnagiri: District Council teachers better than private: Anchal Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.