रत्नागिरी जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, मतदारांची नोंद किती...वाचा
By शोभना कांबळे | Published: November 9, 2023 04:29 PM2023-11-09T16:29:21+5:302023-11-09T16:29:36+5:30
येत्या ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार
रत्नागिरी : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी २१ ऑक्टोबर रोजी करण्यात आली असून या यादीत एकूण १३,३१,४९३ मतदारांची नोंद झाली आहे. यात पुरुष मतदार ६,४२,४७८, तर स्त्री मतदारांची संख्या ६,८९,००३ इतकी असून १२ अन्य मतदार आहेत. येत्या ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली.
हे निवडणूक वर्ष आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणा तयार हव्यात, या दृष्टीने मतदार यादी अद्यावत करण्यासाठी जिल्ह्यात मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण २०२४ कार्यक्रम राबविण्यात आला. गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच महाराष्ट्रात घरोघरी जाऊन मतदारांचे बीएलओमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यातील नावांमधील दुरुस्ती, नाव कमी करणे, नावांची नोंदणी तसेच पत्ताबदल आदी प्रकारे मतदार यादी अद्यावत करून तिची २१ ऑक्टोबर रोजी प्रारूप प्रसिद्धी करण्यात आली आहे. त्यानुसार या यादीत १३ लाख ३१ हजार ४९३ मतदारांची नोंद झाली आहे.
२१ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हरकती दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानंतर त्यावर सुनावणी झाल्यानंतर येत्या ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहितीही राहुल गायकवाड यांनी दिली.
गेल्या वर्षी अंतिम यादीत १३ लाख ३० हजार ९४० मतदारांचा समावेश होता. सध्या प्रारूप यादीत मतदारांची संख्या वाढलेली दिसत आहे. ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम यादी मतदारांची संख्या निश्चित होईल, असेही उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.