विविध विकास निर्देशांकात रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार
By मनोज मुळ्ये | Published: February 16, 2024 04:29 PM2024-02-16T16:29:04+5:302024-02-16T16:29:51+5:30
रत्नागिरी : सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशीलाच्या आधारे पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार ...
रत्नागिरी : सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशीलाच्या आधारे पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकाबाबत प्रथम क्रमांक नोंदवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील समारंभात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार साेहळ्याला केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अनंत नागेश्वरन आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर उपस्थित हाेते. जिल्ह्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत विकासाची शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद करुन, त्याआधारे तयार करण्यात आलेल्या ‘जिल्हा निर्देशांक’ अहवालाचे मुंबईत प्रकाशन करण्यात आले. जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन आधारावर ५४ निर्देशांकाची माहिती येथील जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडे मागविण्यात आली होती. त्यामध्ये विशेषत: एक हजार व्यक्तींमध्ये जिल्ह्यात असणाऱ्या रस्त्यांची लांबी, पक्क्या घरांची संख्या, बँकांची संख्या याबाबतचे निकष होते. या माहितीच्या आधारावर पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्याच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. यात रत्नागिरी जिल्हा अव्वल ठरला.
जिल्हाधिकारी सिंह यांनी पुरस्कारानंतर सांगितले की, हा सन्मान, जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आपल्या सर्वांसाठी खरोखरच अभिमानास्पद आहे. रत्नागिरी हा जिल्हा पुरस्कार मिळविणाऱ्या आठ जिल्ह्यांपैकी एक आहे आणि आपण विकास निर्देशांकात राज्यात प्रथम क्रमांकावर आलो आहोत, ही समाधानाची बाब असल्याचे सांगितले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाशिवाय राज्यस्तरावर अव्वल स्थानावर उभे राहणे शक्य नव्हते. मला खात्री आहे की, पुढील वर्षी या निर्देशांकांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आम्ही सर्वजण आमच्या धोरणात आणखी प्रगती करू, असे ते म्हणाले.