रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावात साकारली पहिली साैरऊर्जेवरील नळपाणी याेजना, लवकरच लाेकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 02:45 PM2023-02-06T14:45:43+5:302023-02-06T15:35:22+5:30
योजनेची चाचणी यशस्वी
प्रशांत सुर्वे
मंडणगड : ‘जल जीवन मिशन’अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली साैरऊर्जेवर आधारित नळपाणी योजना मंडणगड तालुक्यातील पालघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत केळवत या ठिकाणी साकारण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाले असून, या योजनेची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. या याेजनेचे लवकरच लाेकार्पण करण्यात येणार आहे.
वीजबिल किंवा थकबाकी या डाेकेदुखीतून सुटका हाेण्यासाठी केळवत गावातील ग्रामस्थांनी साैरऊर्जेवर आधारीत नळपाणी याेजना यशस्वी करण्याचा निर्धार केला. गावातील नळपाणी याेजनेच्या पुनर्दुरुस्तीसाठी एक लाख चार हजार ४०० रुपये एवढा निधी खर्ची घालण्यात आला आहे. या याेजनेतून ७७ कुटुंबांना वैयक्तिक नळ जाेडणी देण्यात आली असून, एक लाख ४० हजार इतकी लाेकवर्गणी जमा करण्यात आली आहे. ही रक्कम पाणीपुरवठा स्वच्छता समितीच्या नावे ठेवण्यात आली आहे. याेजनेसाठी पाच एच.पी. साेलर बसविण्यात आले आहेत.
नळपाणी योजनेसाठी आवश्यक असलेल्या विजेसाठी सौरऊर्जेचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात ही योजना कार्यरत राहण्यासाठी वीजबिल देयक किंवा थकबाकी हा प्रश्न उद्भवणार नाही. त्यामुळे ती चिंता मिटली आहे. तसेच या योजनेसाठी बसवण्यात आलेल्या पॅनेलची देखभाल व दुरुस्ती पाच वर्षे पॅनेल बसविणारी कंपनीच करणार आहे. योजनेचे ऑपरेटींग व मॅनेजमेंटसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ ग्रामपंचायत स्तरावर निर्माण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.
जिल्ह्यातील पहिलीच साैरऊर्जेवरील ही नळपाणी याेजना असून, या याेजनेची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीवेळी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता प्रतिभा शेरकर, अभियंता विष्णू पवार, जिल्हा समन्वयक कुमार शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.