Cabinet expansion: रत्नागिरी जिल्ह्याला तब्बल २९ वर्षांनी मिळाली दोन मंत्रिपदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 18:34 IST2024-12-16T18:32:45+5:302024-12-16T18:34:06+5:30

रत्नागिरी : तब्बल २९ वर्षांनी रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. नव्याने तयार झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय ...

Ratnagiri district gets two ministerial posts after 29 years | Cabinet expansion: रत्नागिरी जिल्ह्याला तब्बल २९ वर्षांनी मिळाली दोन मंत्रिपदे

Cabinet expansion: रत्नागिरी जिल्ह्याला तब्बल २९ वर्षांनी मिळाली दोन मंत्रिपदे

रत्नागिरी : तब्बल २९ वर्षांनी रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. नव्याने तयार झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापोलीचे आमदार योगेश कदम या दोघांची मंत्रीमंडळामध्ये वर्णी लागली आहे. १९९५ मध्ये जिल्ह्यातील दोन आमदारांना मंत्रिपद मिळाले होते आणि योगायोगाने तेव्हाही युतीचेच सरकार होते.

रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांचे मंत्रिपद आधीपासूनच निश्चित होते, त्यात आता योगेश कदम यांनी बाजी मारली आहे. याआधी १९९५ साली ज्यावेळी शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार आले, त्यावेळी मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळामध्ये संगमेश्वरचे आमदार रवींद्र माने आणि खेडचे आमदार रामदास कदम या दोन मंत्र्यांचा समावेश होता. त्यानंतर तब्बल २९ वर्षांनी आता जिल्ह्याला पुन्हा दोन मंत्रिपदे मिळाली आहेत.

१९९९ आणि २००४ या दोन टर्ममध्ये जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप युतीचे आमदार अधिक असले, तरी राज्यात सत्ता नव्हती. त्यामुळे या दोन्ही काळामध्ये म्हणजेच सलग दहा वर्षे जिल्ह्यात बाहेरील पालकमंत्रीच नेमण्यात आले होते २००९ साली काँग्रेस आघाडीच्या सत्तेत गुहागरचे आमदार भास्कर जाधव मंत्री झाले. २०१३ साली त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर रत्नागिरीचे तरुण आमदार उदय सामंत मंत्री झाले. मात्र, त्यानंतर २०१४ ते १९ या काळात शिवसेना-भाजपची सत्ता असतानाही देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये रत्नागिरीतील एकाही आमदाराला मंत्रिपद मिळाले नाही.

२०१९ मध्ये उद्धवसेना स्वतंत्र झाली आणि महाविकास आघाडीची सत्ता आली. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात उदय सामंत यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्रिपद मिळाले. अडीच वर्षांपूर्वी राजकीय समीकरणे बदलल्यामुळे महायुतीची सत्ता आली आणि उदय सामंत यांच्याकडे उद्योग खात्याच्या मंत्रिपदासह रत्नागिरीचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले. मात्र, १९९५ नंतर २०२४ च्या निवडणुकीपर्यंत जिल्ह्यात कधीही दोन मंत्रिपदे मिळाली नाहीत. याउलट यातील बराचसा काळ पालकमंत्री जिल्ह्याबाहेरीलच नेमला गेला होता. आता २०२४ च्या निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत असल्याने जिल्ह्यात शिंदे सेनेच्या कोट्यातूनच दोन मंत्रिपदे मिळत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शब्द खरा केला

निवडणुकीआधी दापोली येथे झालेल्या योगेश कदम यांच्यासाठीच्या प्रचार सभेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘तुम्ही मला आमदार द्या, मी त्याला नामदार करतो’, असे आश्वासन मतदारांना दिले होते. एकनाथ शिंदे यांनी आपला हा शब्द खरा केला असून, योगेश कदम यांनी रविवारी राज्यमंत्रिपदासाठी शपथ घेतली आहे.

दुसऱ्या टर्ममध्ये मंत्रिपद

रत्नागिरीचे आमदार उदय सामंत २००४ साली सर्वात प्रथम निवडून आले. २००९ साली ते दुसऱ्यांदा निवडून आले आणि त्या टर्मच्या शेवटच्या काही महिन्यांसाठी त्यांना राज्यमंत्रिपदासह रत्नागिरीचे पालकमंत्री पद देण्यात आले. योगेश कदम यांना मात्र आपल्या दुसऱ्या टर्मच्या सुरुवातीलाच मंत्रिपद मिळाले आहे.

उदय सामंत यांनी चौथ्यांदा घेतली मंत्रिपदाची शपथ

रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आता चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. २०१३ साली त्यांनी मंत्रिपदाची पहिल्यांदा शपथ घेतली, त्यावेळी त्यांच्याकडे नऊ खात्यांचे राज्यमंत्रिपद होते. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सत्तेत त्यांनी दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद होते. त्यानंतर २०२२ मध्ये महायुतीची सत्ता आल्यानंतर उदय सामंत यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांच्याकडे उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. आता उदय सामंत यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यांच्याकडे आधीचे उद्योग खातेच कायम राहणार की, त्यांना त्यापेक्षा आणखी चांगले खाते देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ratnagiri district gets two ministerial posts after 29 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.