रत्नागिरी जिल्हा जातपडताळणी समिती राज्यात द्वितीय, बार्टी, पुणेतर्फे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 06:03 PM2018-03-31T18:03:44+5:302018-03-31T18:03:44+5:30
रत्नागिरी येथील जिल्हा जातपडताळणी समितीला शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेतर्फे गौरविण्यात आले आहे.
रत्नागिरी : येथील जिल्हा जातपडताळणी समितीला शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेतर्फे गौरविण्यात आले आहे.
आयुक्त दिलीप हळदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील समितीने गेल्या तीन वर्षांपासून आपल्या कार्यक्षमतेचा ठसा स्वतंत्र उमटवला आहे. या विभागात अपुरी पदसंख्या असूनही विविध प्रवर्गातील विद्यार्थी तसेच नागरिक यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्रांचा निपटारा करण्याकडे या कार्यालयाचा कल असतो.
पडताळणीच्या कामाचा आवाका लक्षात घेऊन नोव्हेंबर २०१६मध्ये राज्यात ३६ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासाठी अजूनही पदभरती न झाल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. असे असतानाही आयुक्त हळदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त प्रमोद जाधव यांनी पडताळणीचे काम वेगाने होण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवले आहेत.
रत्नागिरीतील जातपडताळणी कार्यालयातील वरिष्ठ लिपीक, स्टेनो, शिपाई, संशोधन अधिकारी, पोलीस शिपाई ही पदे रिक्त असल्याने या कार्यालयाचे उपायुक्त आणि कनिष्ठ लिपीक यांच्यावरच मदार आहे. आयुक्त दिलीप हळदे यांच्याकडेही रत्नागिरीसह कोकणातील अन्य जिल्ह्यांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
या कार्यालयाच्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने या समितीला राज्यात द्वितीय क्रमांक देऊन गौरव केला आहे. बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी दिलीप हळदे यांचा गौरव केला.
महाविद्यालयांनी जागा द्यावी
बारावी शास्त्र शाखेत शिकणाऱ्या मुलांना जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळावे, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या सहकार्याने दरवर्षी शिबिर आयोजित केले जाते. त्यात या मुलांकडून सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दाखल करून घेतले जातात. जिल्ह्यातील अन्य महाविद्यालयांनी जागा उपलब्ध करून दिल्यास जातपडताळणी समिती या महाविद्यालयांमध्येही शिबिर घेईल.
प्रमोद जाधव,
उपआयुक्त, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी