धुक्यात हरवला रत्नागिरी जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:40 AM2019-12-16T11:40:11+5:302019-12-16T11:48:10+5:30
उत्तरेकडे होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे कोकणपट्ट्यात थंडीची चाहुल लागू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडीमुळे रत्नागिरी धुक्यात हरवल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरीचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने थंडी जाणवू लागली आहे.
रत्नागिरी : उत्तरेकडे होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे कोकणपट्ट्यात थंडीची चाहुल लागू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडीमुळे रत्नागिरी धुक्यात हरवल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरीचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने थंडी जाणवू लागली आहे.
यावर्षी बदलत्या हवामानाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अवकाळी पावसाने आपला मुक्काम ऑक्टोबर महिन्यापर्यंत ठेवल्याने थंडीदेखील लांबली आहे. त्यामुळे साऱ्यांनाच थंडीची प्रतीक्षा आहे. दिवाळीपासून सुरू होणारी थंडी अद्याप सुरू न झाल्याने साऱ्यांनाच उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
मात्र, शुक्रवारपासून पहाटेच्यावेळी काहीशी थंडी जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात थंडीचे प्रमाण चांगले असल्याने हुडहुडीमुळे शेकोट्या पेटू लागल्या आहेत. नदीकाठचा भाग दाट धुक्याच्या झालरीने व्यापून गेल्याचे चित्र दिसू लागले आहे.
आंबा मोहोरासाठी आवश्यक असणारी थंडी शुक्रवारपासून जाणवू लागल्याने आंबा बागायतदार सुखावले आहेत. पुढील काही दिवसात थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रत्नागिरीचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत आले आहे. रविवारी दिवसभर हवेत गारठा जाणवत होता. आठवडाभरात हे प्रमाण अजून खाली येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.