रत्नागिरी जिल्ह्यात श्वानदंशाच्या रूग्णांचे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 05:35 PM2018-05-29T17:35:54+5:302018-05-29T17:35:54+5:30
ग्रामीण तसेच शहरी भागात श्वानांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कळपाने फिरणारे हे श्वान दिसेल त्याला चावा घेत असल्याने अनेकांनी श्वानांचा धसका घेतला आहे. श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन प्रसंगी मृत्यूही ओढवतो. त्यामुळे श्वानाने चावा घेतल्यास तत्काळ रेबीज प्रतिबंधक लस टोचली जाते.
अरूण आडिवरेकर
रत्नागिरी : ग्रामीण तसेच शहरी भागात श्वानांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कळपाने फिरणारे हे श्वान दिसेल त्याला चावा घेत असल्याने अनेकांनी श्वानांचा धसका घेतला आहे. श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन प्रसंगी मृत्यूही ओढवतो. त्यामुळे श्वानाने चावा घेतल्यास तत्काळ रेबीज प्रतिबंधक लस टोचली जाते.
गेल्या चार वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात १३ हजार ४४९ जणांना श्वानांनी जखमी केले आहे. मात्र, जखमीवर तत्काळ उपचार होत असल्याने श्वानांच्या चाव्याने एकाचाही मृत्यू झालेला नाही. शिवाय श्वानांनी चावा घेतलेल्या रूग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.
रेबीज हा एक विषाणू आहे. श्वान चावल्यानंतर त्याचा संसर्ग माणसाला होतो. श्वान हा त्याच्या इमानदारीसाठी प्रसिद्ध आहे. हाच श्वान जर बिथरला (त्याला रेबीज झाला) तर तो चावलेल्या माणसाच्या जिवावर बेततो. श्वान अनेक अनोळखी व्यक्तींना चावतो. त्यामुळे त्या साऱ्यांनाच आजार होतो, असं नाही. रेबीज झालेल्या श्वानाने चावा घेतला तर त्या व्यक्तिला हमखास रेबीज होतो.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार वर्षात तब्बल १३ हजार ४४९ जणांना श्वानाने चावा घेतला आहे. मात्र, गतवर्षी श्वानांनी चावा घेतलेल्या रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तत्काळ उपचार होत असल्याने कोणालाही प्राण गमवावा लागलेला नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.
रूग्णालयात तत्काळ दाखल करणे गरजेचे
श्वानदंश झाल्यानंतर त्यावर उपाय न केल्यास रुग्ण शंभर टक्के दगावतो. यावर उपाय आहेत, त्यामुळे धोका टळतो. श्वानदंश (रेबीज) यावर उपाय उपलब्ध आहेत. बºयाचदा ते माहीत नसल्याने किंवा त्याविषयी गैरसमज असल्याने रुग्ण पुढील अवस्थेत जातो. काहीवेळा स्थानिक किंवा घरगुती उपायही केले जातात. श्वानाने चावा घेतल्यास रूग्णाला तत्काळ रूग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सर्वच रूग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठाही उपलब्ध आहे.
- डॉ. अनिरूद्ध आठल्ये,
जिल्हा आरोग्य अधिकारी
रेबीज म्हणजे काय ?
श्वानदंश झाल्याने रेबीज नावाचा आजार होतो. रेबीज नावाचा हा विषाणू श्वानाच्या लाळेत उतरतो. अशा श्वानाने माणसास चावा घेतला तर विषाणू माणसाच्या शरीरात जाऊन माणसाला संसर्ग होतो आणि व हा आजार होतो. हा विषाणू जवळजवळ सर्व सस्तन प्राण्यांमध्ये आढळतो, श्वान, वटवाघळे, सरडे, जंगली प्राणी हे या विषाणूचे कायमचे वसतीस्थान असते. रेबीज झालेल्या व्यक्तीला इतरांपासून लांबही ठेवण्यात येते.
रेबीज लस प्रभावी
रेबीज लस मानवी जनुकापासून बनवलेली असते. ही लस अत्यंत प्रभावी असून, श्वानदंशाचा आजार पूर्णपणे टळू शकतो. ही प्रभावी लस ठराविक काळाने तीन ते पाच डोसमध्ये घ्यावी. श्वानदंशाच्या शक्यतेचा अंदाज घेऊन डॉक्टर या लसचा डोस ठरवतात. पहिला डोस श्वानाने चावा घेतल्याबरोबर त्याच दिवशी दिला जातो. नंतरचे डोस आवश्यकतेप्रमाणे तिसऱ्या, सातव्या, एकविसाव्या, अठ्ठाविसाव्या दिवशी देतात.
विषाणूचा प्रवास थेट मेंदूपर्यंत
श्वान चावला की, त्याच्या लाळेतील विषाणू माणसाच्या शरीरात सोडले जातात. त्यानंतर पुढील एक आठवडा ते आठ आठवडे या कालावधीत हा विषाणू चावलेल्या ठिकाणी प्रसार पावतो. चावा घेतलेल्या ठिकाणच्या मज्जातंतूंमध्ये तो पोहोचतो. तेथून त्याचा प्रवास थेट मेंदूपर्यंत चालतो. त्यानंतर श्वानदंशाची लक्षणं दिसू लागतात.
रत्नागिरीत निर्बिजीकरण
रत्नागिरी शहरात वाढत्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषदेमार्फत श्वानांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत शहरात आढळणाऱ्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले.
श्वानदंश होण्याची शक्यता
काही ठराविक निकष लावून श्वानदंशाची शक्यता आजमावली जाते. त्याप्रमाणे डॉक्टर लसीकरणाचा आराखडा तयार करतात. श्वानाचा चावा शरीरातील कोणत्या भागावर आहे, जखम किती खोल आहे (चेहऱ्यावरील जखमा जास्त धोकादायक असतात) त्या भागात श्वानदंशाचा रुग्ण सापडला आहे का? श्वान पाळीव आहे की भटका आहे, पाळीव श्वानाचे लसीकरण झाले आहे का? ज्या श्वानाने चावा घेतला आहे, त्यावर पुढील एक महिना बारीक लक्ष ठेवले आहे का, त्याच्यात श्वानदंशाची लक्षणं दिसतात का, हे पाहिले जाते.
श्वानदंश झाल्यास हे करा
- - श्वानाने चावा घेतल्यानंतर झालेल्या जखमेवर अथवा ओरखड्यावर ताबडतोब स्वच्छ पाणी ओतून ती जखम साबणाने स्वच्छ करावी.
- - डॉक्टर ती जखम जंतूनाशकाने स्वच्छ करतात. त्यांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे घ्यावीत.
- - धनुर्वाताची लस टोचून घ्यावी. श्वानाने चावा घेतल्यानंतर दोन महत्त्वाची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित घ्यावीत.
- - श्वानदंशाची शक्यता जास्त असेल, तर रेबीजचे इम्युनोग्लोबुलिन चावा घेतलेल्या ठिकाणी किंवा कंबरेवर दिले जाते.
प्रतिबंधात्मक उपाय
- - ठराविक कालावधीने पाळीव श्वानांचे लसीकरण करावे, त्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवाव्यात.
- - भटक्या श्वानांचा बंदोबस्त करणे, बंदिस्त करणे, त्यांची प्रजोत्पत्ती थांबवणं.
- - श्वानदंशाच्या नोंदी सरकारी अधिकाऱ्यांकडे अधिकृतपणे करणे.
- - श्वानदंशाबद्दल जनजागृती करणं.
- - सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्वानदंश (रेबीज) हा आजार झाला आणि उपाय झाले नाहीत, तर रुग्ण शंभर टक्के दगावतो. श्वान चावणं आणि त्यामुळे होणारा रेबीज याविषयी आपल्याला ऐकून नक्की माहीत असतं.
दोन महिन्यांच्या कालावधीत लक्षणं
- - चावा घेतल्यानंतर सुमारे एक-दोन महिन्यांच्या कालावधीत लक्षणं दिसू लागतात. मळमळणे, डोकेदुखी, अंग दुखणं, थकवा, चावा घेतलेल्या ठिकाणी जडपणा येणं, अशी साधारणपणे लक्षणं असतात.
- - त्यानंतर पुढील अवस्थेत श्वानदंशाची (रेबीज) लक्षणं दिसू लागतात. यावेळेपर्यंत विषाणू मज्जासंस्थेपर्यंत पोहोचलेला असतो. या अवस्थेत भ्रम, भास निर्माण होणे, अस्वस्थपणा येणे, झटके येणे, उजेड सहन न होणे, ताप येणे, तोंडाला पाणी सुटणे, लाळ सुटणे, डोळ्यातून पाणी येणे, अशी लक्षणं दिसू लागतात.
- - लाळ सुटणं, पाणी पाहिल्यावर भीती वाटणे, लाळ गिळणे अवघड होऊन ती तोंडात जमा होणं ही लक्षणं तर श्वानदंशाचे निदान पक्के करतात. येथपर्यंत श्वानदंशाचे निदान होऊन उपाय केले नसतील तर श्वास बंद होणं,
- हृदय बंद पडणं, रक्तपेशी कमी होणं, अंतर्गत रक्तस्त्राव होणं अशी लक्षणं निर्माण होऊन रोगी दगावतो.