रत्नागिरी जिल्हा नियोजनच्या निधीत १७ कोटींची वाढ, धावपळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 05:38 PM2019-05-31T17:38:16+5:302019-05-31T17:40:43+5:30

रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९ -२० या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या २०१ कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असून, यावर्षी जिल्हा नियोजनच्या निधीत १७ कोटी ८७ लाखांची वाढ झाली आहे. विशेषत: रस्ता दुरूस्ती आणि आरोग्यासाठी यावेळी अधिक तरतूद करण्यात आली आहे.

Ratnagiri district planning fund raises 17 crores, running the runway | रत्नागिरी जिल्हा नियोजनच्या निधीत १७ कोटींची वाढ, धावपळ सुरू

रत्नागिरी जिल्हा नियोजनच्या निधीत १७ कोटींची वाढ, धावपळ सुरू

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा नियोजनच्या निधीत १७ कोटींची वाढ, धावपळ सुरूआराखडा २०१ कोटींचा, रस्ता दुरुस्तीबरोबरच आरोग्यासाठी अधिक तरतूद

रत्नागिरी : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९ -२० या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या २०१ कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असून, यावर्षी जिल्हा नियोजनच्या निधीत १७ कोटी ८७ लाखांची वाढ झाली आहे. विशेषत: रस्ता दुरूस्ती आणि आरोग्यासाठी यावेळी अधिक तरतूद करण्यात आली आहे.

गतवर्षी १८३ कोटी १३ लाख रूपये इतक्या जिल्हा वार्षिक आराखड्याला मंजुरी मिळाली होती. यावर्षी त्यात १७.८७ कोटींची वाढ झाली असून, २०१ कोटींचा एकूण आराखडा तयार करण्यात आला आहे. यावर्षी सर्वच सेवांसाठी अधिक निधी देण्यात आला आले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि आरोग्य सेवेसाठी प्रत्येकी ३० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याखालोखाल एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमासाठी २५ कोटी ६० लाख एवढी तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी सामान्य शिक्षणासाठी १२ कोटी ६ लाख मंजूर झाले आहेत.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये, उपकेंद्रे, उपजिल्हा रूग्णालयाचे बांधकाम व विस्तारीकरण, औषधे व साधनसामुग्री अशा सर्व आरोग्य सेवांसाठी ३० कोटींची सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्य केंद्रे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे यांची दुरूस्ती होण्याची शक्यता आहे. एकूण नगरविकासासाठी १७ कोटी ५१ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी १५ कोटी ५० लाख नगरोत्थान महा अभियानासाठी तरतूद आहे. उर्वरितमधून विकास योजनांसाठी नगरपरिषदांना सहायक अनुदान, अग्निशमन सेवा आदीचे बळकटीकरण, दलित वस्त्यांमध्ये सुधारणांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेसाठीही एक लाखाची तरतूद असून, अंगणवाड्या बांधकामासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्युत विकासासाठी ३ कोटी ८० लाखांची तरतूद असून, गतवर्षी २ कोटी इतकाच निधी होता तर ग्रामीण व लघुउद्योगांसाठी कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यांसाठीही १२ कोटी ५० लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी भरघोस निधी मिळाला असला तरी चार महिन्यांचा पावसाळा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता यामुळे नोव्हेंबर डिसेंबरनंतरच यंत्रणांकडून कामांना सुरूवात होणार आहे.

अंगणवाड्यांची दुरूस्ती
अंगणवाड्या बांधकामासाठी ५ कोटींची तरतूद या आराखड्यात करण्यात आली आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या अंगणवाड्यांची दुरूस्ती यावर्षी या निधीतून होण्यास हरकत नाही.

जलयुक्त शिवार अभियान
इतर जिल्हा योजना अंतर्गत यावर्षी जलयुक्त शिवार अभियानासाठी २ कोटींची तरतूद करण्यात आल्याने यावर्षी या योजनेची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठीही ३० कोटी १५ लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे.

आंतरदेशिय जलवाहतूक
आंतरदेशिय जलवाहतुकीसाठी २ कोटीची तरतूद असून, यात बंदरालगतच्या सुखसोयी आणि बंदराचा विकास तसेच प्रवासी सुखसोयी यांचा समावेश आहे.

साकव - रस्ते होणार मजबूत
साकव बांधकामांसाठी १० कोटी ५० लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरणसाठी २ कोटीची तरतूद करण्यात आली असून ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणासाठी यावर्षी १० कोटी ५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षी केवळ ४० लाखांची तरतूद असल्याने रस्त्यांची दुरूस्ती खोळंबली होती.

पाटबंधारे व पूरनियंत्रण
गतवर्षी पाटबंधारे व पूरनियंत्रणासाठी १ कोटी ६ लाख एवढीच तरतूद होती. मात्र यावर्षी पाटबंधारे योजनेसाठी १ कोटी तर पूरनियंत्रण कामासाठी ३ कोटी ५० लाख मिळून ४ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पाटबंधारेंची प्रलंबित कामे तातडीने हाती घेणे शक्य होणार आहे. पाटबंधारेची रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होण्याची आशा आहे.

पर्यटन स्थळांचा विकास
सामान्य आर्थिक सेवांसाठी १ कोटी ६० लाखांची तरतूद आहे. त्यापैकी जिल्ह्यातील यात्रा स्थळांच्या विकासासाठी ६० लाख तर पर्यटन स्थळांच्या विकासासाठी १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

सामान्य सेवा
सामान्य सेवेसाठी गतवर्षी ३ कोटी ६६ लाख ४० हजार रूपयांची तरतूद होती, यावर्षी ५ कोटी ७० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पोलीस व तुरूंग आस्थापनात पायाभूत सुविधा पुरविणे तसेच सीसीटीव्ही यंत्रणा व अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ५१ लाख ५० हजारांची तरतूद केली आहे. तसेच नाविन्यपूर्ण योजनेसाठी गतवर्षी ८ कोटी २४ लाख ८ हजार रूपयांची तरतूद केली होती. यावर्षी ९ कोटी ४ लाख एवढी वाढ केली आहे.

Web Title: Ratnagiri district planning fund raises 17 crores, running the runway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.