रत्नागिरी जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्याला लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 02:40 PM2018-05-11T14:40:47+5:302018-05-11T14:40:47+5:30
रत्नागिरी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, रत्नागिरीचा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन रमेश पवार (४०) याला २५ हजारांची लाच स्वीकारताना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
रत्नागिरी : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, रत्नागिरीचा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन रमेश पवार (४०) याला २५ हजारांची लाच स्वीकारताना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
कणकवली येथील तक्रारदार हेमंत धुरी हे राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागृती फाऊंडेशन ही एनजीओ गेल्या १० वर्षांपासून चालवत आहेत. या संस्थेला शासकीय अनुदान मिळते. त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे, ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकांची जबाबदारी आहे.
मात्र, तक्रारदार हेमंत धुरी यांच्या संस्थेच्या कामकाजात पवार याने वारंवार चुका काढल्या. प्रकल्प बंद करतो, असे सांगून त्यांच्याकडे दरमहा ५ हजार रुपये याप्रमाणे एका वर्षासाठी ६० हजार रूपये एवढ्या रकमेची मागणी केली.
तक्रारदार संस्थेने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार या विभागाने तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली. सापळा कारवाईच्या वेळी सचिन पवार याने ६० हजार रूपये लाचेच्या रकमेपैकी २५ हजार रुपये पहिला हप्ता म्हणून स्वीकारल्यानंतर विभागाच्या पथकाने त्याला पंचांसमक्ष रंगेहात पकडले. त्याच्याकडील २५ हजार रुपयेही हस्तगत केले.
कणकवली (सिंधुदुर्ग) येथे मुख्य कार्यालय असलेल्या जागृती फाऊंडेशन या संस्थेचे हेमंत धुरी हे अध्यक्ष आहेत. चाईल्ड लाईनसाठी तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचे एचआयव्हीपासून रक्षण होण्याकरिता ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे.