रत्नागिरी जिल्ह्यात बैलांना घेऊन येणारा टेम्पाे पाेलिसांनी अडविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:48+5:302021-05-30T04:25:48+5:30
रत्नागिरी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी रस्ता असलेल्या ओंबळी - खेड रस्त्यावरून रत्नागिरी जिल्ह्यात तीन ...
रत्नागिरी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी रस्ता असलेल्या ओंबळी - खेड रस्त्यावरून रत्नागिरी जिल्ह्यात तीन बैलांची अवैध वाहतूक करणारा पिकअप टेम्पो पोलादपूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे़ पाेलिसांनी गाडीसह तीन व्यक्तींना गुरुवारी मध्यरात्री ११ वाजता ताब्यात घेतला. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली. मात्र, ही जनावरे जिल्ह्यात नेमकी काेठे आणली जात हाेती, याचा तपास पाेलीस घेत आहेत़
पांगळोली पैठण येथील राहुल दगडू कदम (२६, चालक) याने फिर्याद दिली आहे़ गुरुवारी रात्री पिकअप टेम्पो (एमएच ०६, पीजी ४९७५) मधून तीन बैल घेऊन कोणतीही वैद्यकीय तपासणी अथवा प्रमाणपत्र न बाळगता वाहतूक करत हाेते़ तसेच दोन जनावरांमध्ये आवश्यक तेवढे अंतर न ठेवता, जनावरांना दुखापत न होण्याबाबत दक्षता न घेता, जनावरांची देखभाल करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीची नेमणूक न करता वाहतूक करत असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनाला आले़ असिफ अस्लम तिवडेकर(२५), सिराज हुसैन जोगिलकर (वय ३६) आणि सिराज म्हामून जोगिलकर (४०, तिघेही रा़ खांबेश्वरवाडी, ता.पोलादपूर, जि.रायगड) हे कशेडी घाटाला पर्यायी रस्ता असलेल्या ओंबळी - खेड रस्त्यावरून रत्नागिरी जिल्ह्यात येत हाेते़ मात्र, पाेलादपूर पाेलिसांनी ही वाहतूक राेखून गाडीसह तिघांना ताब्यात घेतले आहे़
पाेलिसांनी तिघांविराेधात प्राणी संरक्षण अधिनियम, १९५५चे कलम ५, प्राण्यांसोबत क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याचे १९६०चे कलम ११, प्राणी वाहतूक अधिनियम तसेच मोटारवाहन कायदा कलम ६६(१),१९२ प्रमाणे भारतीय दंड विधान कलम ३४ अन्वये पोलादपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे़