रत्नागिरी जिल्ह्यात सारीसह इलीचे तब्बल २,३६१ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 05:49 PM2020-10-20T17:49:36+5:302020-10-20T17:51:45+5:30
CoronaVirus, hospital, Ratnagiri माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात १०० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यात २,३६१ सारी आणि इलीचे रुग्ण, तर २९१ कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.
रत्नागिरी : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात १०० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यात २,३६१ सारी आणि इलीचे रुग्ण, तर २९१ कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती महेश म्हाप व सर्व पदाधिकारी यांच्या समन्वयाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकसंख्येला दोन वेळा भेटी देऊन संशयित कोविड रुग्ण शोधणे, हा महत्त्वाचा उद्देश समोर ठेवून १५ सप्टेंबरपासून ही मोहीम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यास सुरूवात झाली आहे. तपासणी दरम्यान कोमॉर्बीड आजाराचे म्हणजे डायबेटीस, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनी विकार इत्यादी प्रकारचे १ लाख १२ हजार ७९ रुग्ण आढळून आले. या मोहिमेंतर्गत कोरोना रुग्णांचे निदान केल्यामुळे एकापासून दुसऱ्या व्यक्तीला आजार होण्याची साखळी खंडित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येमध्ये लक्षणीय घट आढळून येत आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला जिल्ह्यातील जनतेने सहकार्य केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाने धन्यवाद दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली आहे.
दोन हजार कर्मचारी
पहिली फेरी १० ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आली. त्यामध्ये १५ लाख ४२ हजार ६१२ लोकसंख्या आणि ४ लाख ४० हजार ५७२ घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यासाठी ६८६ पथकांमध्ये २,०२९ कर्मचारी कार्यरत होते. १४ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत दुसरा टप्पा राबवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.