पावसाने फिरवली पाठ, पाणी नियोजनाची अवघड वाट
By शोभना कांबळे | Published: August 29, 2023 03:46 PM2023-08-29T15:46:51+5:302023-08-29T15:47:06+5:30
ऊन-पावसाचा खेळ सुरू
रत्नागिरी : यंदा पावसाने सुरुवातीपासूनच नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविण्यास सुरुवात केली होती. यंदा आगमनच उशिरा झाले. मात्र, जून आणि जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पावसाची पाठच होती. मात्र, जुलै मध्यंतरानंतर पावसाने काही दिवस मुसळधार पडून पहिल्या दोन महिन्यांचा कोटा पूर्ण केला. मात्र, ऑगस्ट संपत आल्याने आता जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांची सरासरी गाठणे अवघड वाटत आहे. पावसाची सध्याची वाटचाल पाहता भविष्यात पाणी नियोजनाची वाट अवघड होणार असल्याचे दिसत आहे.
गेल्यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे वार्षिक सरासरीच्या ७६ टक्के पाऊस ऑगस्ट महिन्यात, तर ८९ टक्के पाऊस सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नोंदविला गेला होता. यंदा मान्सूनचे आगमनच उशिरा झाले. परंतु जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मुसळधार पडलेल्या पावसाने जून आणि जुलै या दोन महिन्यांची सरासरी ओलांडली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण एकदमच कमी झाले आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात साधारणत: ८२९ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा ऑगस्ट महिना संपत आला आहे. या महिन्यात केवळ ३७१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
हवामान खात्याकडून पाऊस कोकणात पुन्हा परतणार असल्याचा अंदाज अधूनमधन व्यक्त होत असला तरी पावसाची हुलकावणी कायम आहे. मात्र, सध्या उन्हाळ्याच्या हंगामासारखे ऊन पडू लागले आहे. उष्माही वाढू लागला आहे. मात्र, पावसाची पाठच आहे. मधूनच श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सोमवारी दिवसभरात पावसाच्या सरी जोरदार कोसळल्या. पण या सरीनंतर पुन्हा तेवढेच कडाक्याचे ऊन पडत होते. त्यामुळे पावसाचा लहरीपणा वाढू लागला आहे.
तीन महिन्यांत ७४ टक्के
जून ते सप्टेंबर हे चार महिने कोकणात पावसाचे मानले जातात. या चार महिन्यांच्या कालावधीत जून महिन्यात साधारणत: ८१८ मिलिमीटर, जुलै महिन्यात १२८६, ऑगस्ट महिन्यात ८२९ आणि सप्टेंबर महिन्यात ४२९ मिलिमीटर असा एकूण ३३६४ मिलिमीटर पाऊस पडतो. गेल्या तीन महिन्यांत वार्षिक सरासरीच्या ७४ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. त्यामुळे २५ टक्के पाऊस सप्टेंबरपर्यंत पडेल का? अशी शंका वाटत आहे.
गेल्या वर्षीही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली नव्हती. गेल्या वर्षी २९९१ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे पाणी टंचाई लवकर निर्माण झाली. गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत २५६७ इतका पाऊस झाला होता. त्यातुलनेने यंदा पाऊस कमीच आहे.