रत्नागिरी जिल्ह्याला चार आरोग्य अधिकारी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:49+5:302021-06-19T04:21:49+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूर यांच्या बदलीनंतर जिल्ह्याला ४ आरोग्य अधिकारी मिळणार आहेत. ...
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूर यांच्या बदलीनंतर जिल्ह्याला ४ आरोग्य अधिकारी मिळणार आहेत. त्याबाबतचे शासनाकडून आदेशही काढण्यात आले आहे. त्यामध्ये दोन जिल्हा आरोग्य अधिकारी असल्याने समानधान व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. कमलापूरकर यांची बदली पुणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारीपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये हे सातारा जिल्हा परिषदेतून रत्नागिरी जिल्हा परिषदेत साेमवारी रुजू होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी हे पद गेले अनेक दिवसांपासून रिक्त आहे. त्या पदावर वाशिमच्या सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता चंद्रकांत देशमुख यांची रत्नागिरीत बदली झाली आहे. त्याचबरोबर कोविड व्यवस्थापनेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी पुणे येथील सहायक संचालक डॉ. दिलीप माने यांची तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्तीवर तत्काळ हजर होण्याचे आदेश शासनाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. तसेच बीड जिल्ह्याच्या जिल्हा माता बाल व संगोपन अधिकारी डॉ. स्वाती कांबळे यांची बदली रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी पदावर झाली आहे. त्यांनाही तत्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.