रत्नागिरी जिल्ह्यात यंदा ७४०२ लोकांची पाण्यासाठी वणवण, शासनाची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:04 PM2018-05-15T17:04:03+5:302018-05-15T17:04:03+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात २९ गावातील ५६ वाड्यांमधील ७४०२ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून, त्यांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे. त्यांना ९ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण झाले आहेत.
रत्नागिरी : जिल्ह्यात २९ गावातील ५६ वाड्यांमधील ७४०२ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून, त्यांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे. त्यांना ९ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण झाले आहेत.
टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. भयंकर उकाडा होत असून, पाण्याची पातळी खालावली आहे. जिल्ह्यात गतवर्षी या दिवसांमध्ये ७८ गावातील १३५ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु होती.
या टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करताना शासनाची दमछाक झाली होती. मात्र, गतवर्षीची पाणी टंचाईची स्थिती पाहता यंदाची संख्या निम्म्यावर आली आहे. तरीही लोकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु आहे.
मागील आठवड्यामध्ये जिल्ह्याच्या ४ तालुक्यांमध्ये २६ गावातील ५२ वाड्यांना भीषण पाणीटंचाई जाणवत होती़ त्यामध्ये खेडमध्ये १२ गावातील २१ वाड्यांमध्ये, चिपळुणातील ९ गावातील २२ वाड्यांमध्ये, संगमेश्वरात २ गावातील ६ वाड्यांना आणि लांजात ३ गावातील ३ वाड्यांचा समावेश होता.
या टंचाईग्रस्तांना प्रशासनाकडून ८ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात होता. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्म्याचा परिणाम येथील पाणीसाठ्यावर होत असून, टंचाईग्रस्तांची संख्या वाढत आहे.
चालू आठवड्यात खेड तालुक्यामध्ये २ गावातील ३ वाड्यांची, तर संगमेश्वरमध्ये १ एका गावातील एका वाडीची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. या टंचाईग्रस्तांना शासनाकडून केवळ ९ टँकरनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत आहे.
पाण्यासाठी भटकंती
दरवर्षी पाणीटंचाई उद्भवते़ या टंचाईग्रस्तांमध्ये धनगरवाड्यांचा समावेश आहे़ डोंगरदऱ्यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
जनावरे तडफडू लागली
जनावरांना देण्यासाठी पाणी नसल्याने ती तडफडू लागली आहेत़ उन्हामुळे पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी, ओढे, नाले आटल्याने ही परिस्थिती ओढवली.
तीव्रता जास्त
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईचे प्रमाण कमी असले तरी तीव्रता मात्र जास्त आहे. खेड तालुक्यात तर काही किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.