‘लालपरी’ सुसाट, रत्नागिरी विभाग राज्यात तिसरा; किती मिळाले उत्पन्न.. वाचा सविस्तर
By मेहरून नाकाडे | Published: November 28, 2024 06:50 PM2024-11-28T18:50:40+5:302024-11-28T18:50:57+5:30
मेहरून नाकाडे रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेमुळे ‘लालपरी’ सुसाट धावत आहे. उत्पन्नाचे उद्दिष्ट शंभर ...
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेमुळे ‘लालपरी’ सुसाट धावत आहे. उत्पन्नाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करीत राज्यात तृतीय क्रमांक मिळविण्यात रत्नागिरी विभागाला यश आले आहे. दि. १ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत प्रति दिन रत्नागिरी विभागाला एक कोटी १० लाख ७७ हजारांचे उद्दिष्ट होते. विभागाने एक कोटी ११ लाख ३८ हजार रुपये उत्पन्न प्राप्त करत १००. ५५ टक्के उद्दिष्ट प्राप्त करून विभागात तृतीय क्रमांक मिळविला आहे. प्रथम क्रमांकावर परभणी विभाग, तर द्वितीय क्रमांकावर लातूर विभाग आहे. चाैथा क्रमांक अमरावती विभागाने मिळविला आहे.
शासनाने महिलांना एसटीतून निम्म्या तिकीट दरात प्रवास करण्याची सवलत दिली. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीही निम्म्या तिकीट दरात प्रवासाची सवलत असून, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनांचा एसटीला चांगला फायदा झाला असून, प्रवासी भारमानात भरघोस वाढ झाली आहे.
दिवाळीच्या सुटीत तर दि. १५ नोव्हेंबरपर्यंत पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे प्रवाशांनी भरभरून एसटीच्या गाड्या पळत होत्या. रत्नागिरी विभागानेही सुटीच्या कालावधीत प्रवाशांची गर्दी पाहून गर्दीच्या मार्गावरील फेऱ्या वाढविल्या होत्या. मुंबई, पुणे मार्गावरील जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. एकूणच योग्य नियोजनामुळे एसटीला फायदा झाला आहे.
आगार - उद्दिष्ट - पूर्तता - टक्केवारी
- परभणी - ८५.४९ - ८६.५१ - १०१.२०
- लातूर - १११.७९ - ११२.४४ - १००.५७
- रत्नागिरी - ११०.७७ - १११.३८ - १००.५५
- अमरावती - ६६.१३ - ६६.१६ - १००.०५
प्रवाशांची गर्दी पाहून त्या-त्या मार्गावर फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली होती. विभागातील सर्व चालक-वाहक, कर्मचारी, अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे उद्दिष्टपूर्ती करण्यात यश आले आहे. - प्रज्ञेश बोरसे, विभागनियंत्रक, रत्नागिरी.