रत्नागिरी : उकाड्याने हैराण झालेल्या नाट्यरसिकांनी नाटकच पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 01:49 PM2018-04-02T13:49:12+5:302018-04-02T13:49:12+5:30
नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद असल्याने झालेल्या प्रचंड उकाड्यामुळे नाट्यरसिकांनी शनिवारी रात्री झालेला नाटकाचा प्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवला. वातानुकुलीत नाट्यगृहाची वातानुकूलित प्रयोगाची तिकिटे काढलेली असताना व तसे नाटकाच्या जाहिरातीत उल्लेख असतांना नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद का ? असा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी आयोजकांना धारेवर धरले तर, रत्नागिरी नगरपालिकेच्या व नगराध्यक्षांच्या नावाने शिमगा केला.
रत्नागिरी : नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद असल्याने झालेल्या प्रचंड उकाड्यामुळे नाट्यरसिकांनी शनिवारी रात्री झालेला नाटकाचा प्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवला.
वातानुकुलीत नाट्यगृहाची वातानुकूलित प्रयोगाची तिकिटे काढलेली असताना व तसे नाटकाच्या जाहिरातीत उल्लेख असतांना नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद का ? असा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी आयोजकांना धारेवर धरले तर, रत्नागिरी नगरपालिकेच्या व नगराध्यक्षांच्या नावाने शिमगा केला.
सुमारे दोन महिने नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद आहे, या आधी झालेल्या एका नाट्यप्रयोगाच्या वेळीही रसिकांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली होती. मात्र, ही यंत्रणा सुरु करण्यास नगरपालिकेकडून विलंब होत होता.
आजवर हजारो नाटकांचे रत्नागिरीत यशस्वी आयोजन करणाऱ्या आयोजकांनादेखील नाट्यरसिकांच्या असुविधेमुळे दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. वातानुकूलित यंत्रणा या प्रयोगाआधी दुरुस्त होईल अशा नगरपालिकेच्या आश्वासनामुळेच आम्ही या नाटकाचा प्रयोग लावला अशी माहिती आयोजक किशोर सावंत यांनी दिली.
नाट्यगृहातील असुविधा नाट्यगृहातील असुविधेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत रसिकांनी प्रयोग रोखल्यावर नाटकातील कलाकार उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांना रसिकांसमोर येऊन संवाद साधावा लागला.
नगरपालिकेच्या या असुविधेमुळे रत्नागिरीचे नाव खराब होत आहे अशी खंत अनेक रसिकांनी व्यक्त केली. सुमारे दोन महिन्यांपासून नाट्यगृहातील जनरेटर बंद असल्याने वातानुकूलित यंत्रणा सुरु करता येत नाही, यामुळे नाट्यगृहात प्रचंड उकाडा होतो.
अनेक नाट्य आयोजकांनी याबाबत नगरपालिकेला कळवूनही या कामात विलंब होत आहे. नाट्यगृहातील स्वच्छतागृहातील दुर्गंधीमुळे डाव्या बाजूकडील खुर्च्यांवर बसून कार्यक्रम बघणे देखील अतिशय कठीण होते. संपूर्ण रत्नागिरीत स्वच्छता कार्यक्रम राबवणारी पालिका किमान कार्यक्रमाच्या वेळी तरी नाट्यगृहातील स्वच्छतागृहातील स्वच्छता का करत नाही ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.