फसवणुकीची पाळेमुळे रत्नागिरीत
By admin | Published: December 30, 2016 11:43 PM2016-12-30T23:43:04+5:302016-12-30T23:43:04+5:30
मुंबईत ५७२ कोटीची फसवणूक : ठेवींमधून जमलेली रक्कम रत्नागिरीच्या जमिनीत
रत्नागिरी : मुंबईत केलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या फसवणुकीची पाळेमुळे रत्नागिरीच्या जमिनीत रूजली असल्यामुळे रत्नागिरी शहर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या रडारवर आले आहे. या फसवणुकीमध्ये रत्नागिरीत महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे पुढे येत आहे. त्या तपासासाठी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका पथकाने रत्नागिरीत येऊन तपासणी केली आहे.
मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे ५७२ कोटी रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. त्याची पाळेमुळे रत्नागिरीत असल्याचे समोर आले आहे. जादा व्याजाचे आमिष दाखवून, लोकांची फसवणूक करून उभे केलेले पैसे रत्नागिरीत जमिनीत गुंतवले असल्याचे पुढे येत आहे. याबाबत मुंबईत एका विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचे नाव अद्यापही गुलदस्त्यात ठेवले आहे. लोकांची आर्थिक फसवणूक करून हा पैसा रत्नागिरीमध्ये जमिनींचे व्यवहार करणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवण्यात आला होता. ही माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोेलिसांचे एक पथक रत्नागिरी येथे दाखल झाले होते. रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने दोन दिवस या गुन्ह्याचा तपास युध्दपातळीवर करण्यात आला.
या दोन दिवसांच्या तपासात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या हाती अनेक पुरावे लागले आहेत. मुंबईत ठेवीदारांकडून गोळा केलेल्या रकमेतील मोठा हिस्सा रत्नागिरीत जागा खरेदीमध्ये गुंतवण्यात आला आहे. त्यात काही सरकारी कर्मचाऱ्यांचा ही सामावेश असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी सील करण्यात आलेली कुवारबांव येथील जागा एका तलाठ्याने परस्पर विकली असल्याचे तपासात पुढे आले आहे. (वार्ताहर)