रत्नागिरी : आवाशीत पाण्याची भीषणता, आठवडाभर थेंबही नाही, महिलावर्ग एमआयडीसीवर धडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 06:06 PM2018-01-25T18:06:48+5:302018-01-25T18:11:17+5:30
एक आठवडा लोटला तरी आवाशी (ता. खेड) गावात एमआयडीसीकडून पाण्याचा एकही थेंब येत नसल्याने कमालीची भीषणता उद्भवली आहे. पाण्यासाठी टाहो फोडत वणवण करणारा महिलावर्ग लवकरच एमआयडीसीच्या कार्यालयावर धडक देणार आहे. परिसरातील कंपन्यांच्या प्रदूषणामुळे त्या विहिरी मृत पावल्या गेल्या. साहजिकच आवाशी गाव हे पूर्णपणे एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून आहे. तीन महिन्यांपासून या गावात पाणी भीषणटंचाई उद्भवली आहे.
आवाशी : एक आठवडा लोटला तरी आवाशी (ता. खेड) गावात एमआयडीसीकडून पाण्याचा एकही थेंब येत नसल्याने कमालीची भीषणता उद्भवली आहे. पाण्यासाठी टाहो फोडत वणवण करणारा महिलावर्ग लवकरच एमआयडीसीच्या कार्यालयावर धडक देणार आहे.
पस्तीस वर्षांपूर्वी येथे औद्योगिक वसाहत आली अन् हळूहळू परिसरासह गावाचा कायापालट होऊ लागला. येथील तरुणांच्या हाताला काम मिळाले. त्यामुळे सर्व सुखसोयी आपसूक प्राप्त होऊ लागल्या. गावच्या विकासाबाबत बोलायचे झाल्यास रस्ते, दिवाबत्तीसह वाडीवाडीवर प्रत्येकाच्या घरापर्यंत काँक्रिटच्या पाखाड्या पोहोचल्या. मात्र, हा विकासच आज त्यांना पाण्यापासून म्हणजेच मूलभूत गरजेपासून कोसो दूर घेऊन गेला. संपूर्ण रासायनिक वसाहत असणाऱ्या या गावातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत पूर्णत: निकामी झाले. पस्तीस वर्षांपूर्वी प्रत्येक वाडीत दोन ते तीन नैसर्गिक विहिरी होत्या.
त्यामुळे पाण्याची समस्या कधीच उद्भवली नव्हती. मात्र, परिसरातील कंपन्यांच्या प्रदूषणामुळे त्या विहिरी मृत पावल्या गेल्या. साहजिकच आवाशी गाव हे पूर्णपणे एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून आहे. तीन महिन्यांपासून या गावात पाणी भीषणटंचाई उद्भवली आहे. कधी - कधी आठवडाभर खंडित, तर अनेक वेळा कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे येथील महिलांना पायपीट करावी लागत आहे.
चालू आठवड्यात पाण्याचा एकही थेंब एमआयडीसीकडून या गावात आलेला नाही. गेल्या तीन दिवसांपासून अनेकजण ट्रॅक्टर वा टँकरचे पाणी विकत घेत आहेत. ज्यांना परवडत नाहीत, असे अनेक ग्रामस्थ घरातील भांडी व कपडे सुमारे दोन ते तीन किलोमीटर एवढी पायपीट करून पºयावर जात आहेत. मात्र, याबाबत कुणीही गंभीरपणे घेतले नाही.
आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास या गावांवर विस्थापित होण्याची वेळ आल्यास आश्चर्य वाटू नये. वाशिष्ठी नदीत पुरेसा पाणीसाठा होत नाही. झालाच तर महावितरणकडून वारंवार होणाऱ्या खंडित विद्युत पुरवठ्यामुळे नदीतील उपसा पंपहाऊसमध्ये करता येत नाही. पाण्याची जुनी असणारी लाईन अनेक ठिकाणी फुटत असल्याने त्याचाही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. एमआयडीसी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, तांत्रिक अडथळे असल्याने ही समस्या उद्भवल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले.
...तर कारखाने हवेत कशाला ?
आमच्या जमिनी घेऊन आम्हाला भूमिहीन केलेत. त्याच जमिनीवर रासायनिक कारखाने उभारुन आमची शेती, फळबागा नामशेष झाल्या. जल व वायूप्रदूषणाने आरोग्यही धोक्यात आले. जलप्रदूषणामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत मृत झाले. एवढा अन्याय करुनही आम्हाला आता मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात असेल म्हणजेच पिण्यासाठी पाणीही उपलब्ध होत नसेल तर ती एमआयडीसी आणि कारखाने हवेतच कशाला? आमच्या जिवावर उठलेल्या या संबंधितांना जाब विचारण्यासाठी आम्ही एमआयडीसी कार्यालयावर धडकणार आहोत, असे महिलांनी सांगितले.
पाणीटंचाईचे संकट
काहीच दिवसांवर शिमगोत्सव येऊन ठेपलेला असून, त्यावरही पाणीटंचाईचे सावट कायम आहे. त्यातच लग्नसराई सुरु असल्याने त्यालाही या समस्येची झळ सोसावी लागत आहे. गावात घरे बांधणीची कामे पाण्याविना बंद होऊ लागली आहेत. सध्या केवळ पाणीटंचाईनेच हे गाव चर्चेत आले आहे.