रत्नागिरी : देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी पारा चढला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 07:45 PM2018-04-03T19:45:21+5:302018-04-03T19:45:21+5:30
देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. एकीकडे उन्हाचा पारा जसजसा वाढतोय तसतसा नगरपंचायत निवडणूक प्रचारातील आरोप - प्रत्यारोपांच्या फैरींचा पारादेखील वाढायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपांना भाजपकडून जशास तसे उत्तर दिले जात आहे. मात्र, काँग्रेसकडून सबुरीचा पवित्रा घेतला गेला आहे.
सचिन मोहिते
देवरुख : देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. एकीकडे उन्हाचा पारा जसजसा वाढतोय तसतसा देवरूख नगरपंचायत निवडणूक प्रचारातील आरोप - प्रत्यारोपांच्या फैरींचा पारादेखील वाढायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपांना भाजपकडून जशास तसे उत्तर दिले जात आहे. मात्र, काँग्रेसकडून सबुरीचा पवित्रा घेतला गेला आहे.
निवडणूक म्हटलं की, प्रचाराची राळ उठविली जाते. यापूर्वी सत्तेत मित्र असलेला आणि राजकीय प्रतिस्पर्धी झाल्यावर आरोप करताना निवडणुकीत मागे-पुढे पाहिलं जात नाही. किंबहुना आपली प्रतिमा जनतेच्या मनावर ठसविण्यासाठी वातावरण निर्मिती केली जाते. यासाठी कॉर्नर सभा, जाहीर सभा यांचा अवलंब होतो.
या प्रचार सभांमुळेच खऱ्या अर्थाने निवडणुकातील रंगत वाढताना दिसते. यावेळी देवरुखच्या निवडणुकीत न्यायालयीन प्रक्रियेत किमान ५-६ दिवस वाया गेल्यामुळे आणि सध्या उन्हाचा पारा वाढलेला असल्याने जाहीर सभा व कॉर्नर सभांवर भर दिसत नाही. डोअर टु डोअर दोन-तीन फेऱ्यांवर उमेदवारांचा भर आहे.
दुसरीकडे पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सेना आणि भाजपमध्ये आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीकडूनही सावध भूमिका घेतली जात आहे. केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावरच राष्ट्रवादीकडून बोलले जाते. मात्र, काँग्रेसचा वरिष्ठ पातळीवरचा एकही नेता देवरुखात आलेला नाही.
याबरोबरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे वरिष्ठ नेतेदेखील सोमवारपर्यंत देवरुखमध्ये आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेचे राज्याचे नेते देवरुखात तळ ठोकून आहेत. भाजपसोबत युती करुन असलेली रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांचीदेखील काँग्रेससारखीच स्थिती आहे. आरपीआय हा भाजपच्या कमळ चिन्हावर प्रभाग १३ मधून एका जागेवर लढत आहे.
गत पाच वर्षांचा विचार करता अडीच वर्षे सेना आणि दुसरी अडीच वर्षे भाजपने राष्ट्रवादीच्या साथीने सत्ताधारी म्हणून काम पाहिले. परंतु सध्या अडीच वर्षे सत्ताधारी म्हणून राहिलेल्या भाजपला म्हणावे तसे काम करता आले नसल्याचाच नगारा सेनेकडून बडविला जात आहे.
पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हटले की, सत्ताधारी माझ्यापर्यंत प्रस्तावच घेऊन आले नाहीत. त्यामुळे इच्छा असतानाही आपल्याला निधी देता आला नाही सांगितले. तर खासदार विनायक राऊत यांनी थापा मारणाऱ्यांचीच आणि दलाली करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, अशी बोचरी टीका भाजपवर केली. आघाडीकडून उमेश शेट्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.