रत्नागिरी : रुग्णवाहिका कंत्राटी चालकांचे पगार थकले, जिल्हा परिषद सभेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:31 PM2018-06-13T17:31:33+5:302018-06-13T17:31:33+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांवर कंत्राटी वाहनचालक सेवा देणाऱ्या ओमसाई या कंत्राटदाराने चालकांचे पगार थकवल्याचे उघड झाले आहे. चालकांना अल्पमानधन देण्याचे प्रकारही घडले आहेत
रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांवर कंत्राटी वाहनचालक सेवा देणाऱ्या ओमसाई या कंत्राटदाराने चालकांचे पगार थकवल्याचे उघड झाले आहे. चालकांना अल्पमानधन देण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे या कंत्राटदाराची या वर्षीची निविदा रद्द करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी व सदस्यांनी केली. या विषयावरून सभागृहात गदारोळ झाला.
ही सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश बामणे, उपाध्यक्ष संतोष थेराडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णवाहिकांवर कंत्राटदारामार्फत कंत्राटी वाहनचालक सेवा पुरवण्याकरिता ई-निविदा काढण्यात आली होती.
यातील ओमसाई या कंत्राटदाराची निविदा सर्वांत कमी ९ हजार ८९७ रुपयांची असून, त्याला मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी मांडला. मात्र, हा कंत्राटदार जाणूनबूजुन कमी रकमेचे कंत्राट भरतो. कमिशनपोटी दर महिन्याला हजारो रुपये कमवतो पण कंत्राटी वाहनचालकांना अल्प मानधन देतो.
एवढ्या कमी पगारात त्यांचे घर कसे चालणार, असा सवाल करून या कंत्राटदाराने जानेवारी महिन्यापासून वाहनचालकांना पगार दिलेला नाही, असे सेना गटनेते उदय बने म्हणाले.
या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी झाली होती. तरीही त्याची निविदा मंजुरीसाठी पुन्हा सभागृहात येतेच कशी, असा सवाल उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी केला. जिल्हा परिषदेचे वाहन क्रमांक एमएस ०८ एफ ०२२७ हे निर्लेखित करून त्याऐवजी नवीन वाहन घेतले जाणार आहे.
रुग्णवाहिका उभी, पगार चालू
रुग्णवाहिकांवर कंत्राटदाराच्या मजीर्तील चालक असून ते न सांगताच गैरहजर असतात. तरीही त्यांचे पूर्ण वेतन दिले जाते. यापुढे अशा चालकांची नियुक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी सदस्य महेश नाटेकर यांनी केली.