रत्नागिरी : अयोध्येत तातडीने राममंदिर उभारावे : नरेंद्राचार्य महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 05:25 PM2018-12-04T17:25:22+5:302018-12-04T17:26:57+5:30
हिंदू धर्माचे अधिष्ठान प्रभू श्रीराम आहेत. ते आमच्या अस्मितेचा, प्रतिष्ठेचा विषय आहेत. यासाठी अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर तातडीने उभारले जावे. कोणताही मार्ग अवलंबा मात्र पहिले मंदिर उभारा, असे आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी येथे केले.
रत्नागिरी : हिंदू धर्माचे अधिष्ठान प्रभू श्रीराम आहेत. ते आमच्या अस्मितेचा, प्रतिष्ठेचा विषय आहेत. यासाठी अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर तातडीने उभारले जावे. कोणताही मार्ग अवलंबा मात्र पहिले मंदिर उभारा, असे आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी येथे केले.
राम मंदिरासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कायदा करावा, अध्यादेश काढून मंदिर उभारणी करावी या मागणीसाठी येथील बांद्रा-कुर्ला संकुल मैदानावर विश्व हिंदू परिषद व हिंदुत्ववादी संघटनांनी एका विशाल धर्मसभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी धर्मसभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज उपस्थित होते. ते म्हणाले, गेली कित्येक वर्षे हिंदू समाज अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी संघर्ष करीत आहे. आता आम्ही पुन्हा मंदिर उभारणीसाठी एकत्र आलो आहोत. राममंदिर हा आम्हा हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आताही अनेक अडथळे आणले जात आहे, शासन वेळकाढू धोरण अवलंबत आहे.
आता आम्ही थांबणार नाही. राम मंदिरासाठी आहुती जरी पडली तरी आम्ही स्वत:ला भाग्यवान समजू. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी विषयक सर्व अत्यावश्यक पुरावे पुरातत्व खात्याने याअगोदरच जाहीर केले आहेत. तरीही हिंदूंना संघर्ष करावा लागत असेल तर ते योग्य नाही. आमच्या भावनांचा आदर करावा.
यावेळी रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, गोविंददेव गिरी महाराज, जैन मुनी नयनपद्मा सागर महाराज, विश्वेश्वरानंद महाराज, डॉ. सुरेंद्र जैन आदींनी मार्गदर्शन केले.
संतपीठावर विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय कार्याध्यक्ष अशोकराव चौगुले, अ. भा. कार्यकारिणी सदस्य दिनेश चंद्र, स्वामी विज्ञानानंद, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री जुगल किशोर, विश्व हिंदू परिषदेचे मुंबई विभाग मंत्री शंकर गायकर, विश्व हिंदू परिषदेचे कोकण विभाग मंत्री रामचंद्र रामुका आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदू व्होटबँकेने एकत्र आले पाहिजे
श्रीराम मंदिराचे नाव आले की हिंदूंना सर्वधर्म समभावाचे डोस पाजले जातात. मात्र हाच सर्वधर्मसमभावाचा मुद्दा अन्य धर्मियांना कधी सांगितला जात नाही. अन्य धर्मियांना हिंदू आपले मित्र वाटत नाहीत, असे का? रामाने अन्यायाविरूद्ध रावणाशी युद्ध केले. त्यावेळी रामाला सहाय्य करण्यासाठी नल, नील, जांबुवंत, सुग्रीव धावले. आता मात्र राम मंदिरासाठी हिंदू व्होटबँकेने एकत्र आले पाहिजे. सध्या तरी अध्यादेशाचाच पर्याय दिसतो. तो काढून मंदिर उभारणी सुरू करावी.
षड्यंत्र हाणून पाडा
सध्या देशभरातील दुर्गम भागात वनवासी समाजातील अज्ञानाचा गैरफायदा घेऊन धर्मांतर केले जात आहे. या समजाला हिंदूंपासून तोडण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या दाखल्यावरील हिंदू धर्म पुसला जात आहे. आम्ही वसईत हा अनुभव घेतला आहे. त्यामुळे हे षड्यंत्र हाणून पाडावे लागेल, असेही यावेळी नरेंद्राचार्य महाराज यांनी सांगितले.