रत्नागिरी : सेवा समाप्तीचा आदेश कर्मचाऱ्यांनी झुगारला, आंदोलन तीव्र करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 04:44 PM2018-05-18T16:44:23+5:302018-05-18T16:44:23+5:30
सेवा समाप्तीचा जिल्हा परिषद प्रशासनाचा आदेश झुगारून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच आहे. पुढील टप्प्यातील लाँग मार्च आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २५० कंत्राटी कर्मचारी नाशिकला रवाना झाले आहेत. अनेक अधिकारी कामावर हजर झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
रत्नागिरी : सेवा समाप्तीचा जिल्हा परिषद प्रशासनाचा आदेश झुगारून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच आहे. पुढील टप्प्यातील लाँग मार्च आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २५० कंत्राटी कर्मचारी नाशिकला रवाना झाले आहेत. अनेक अधिकारी कामावर हजर झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
शासनाने मागण्या मान्य न केल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या या १२०० कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. ते पहिल्या टप्प्यातील आंदोलनासाठी परिषद भवनासमोर बसले होते. त्यानंतरही शासनाने दखल न घेता उलट त्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली.
येत्या ४८ तासात कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्त करण्यात येईल, अशी नोटीस बुधवारी या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना बजावण्यात आली होती. नोटीसकडे दुर्लक्ष करुन एनआरएचएमच्या राज्य संघटनेच्या आदेशाचे पालन करीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले बेमुदत कामबंद आंदोलन सुरुच ठेवले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसमुळे जिल्ह्यातील सुमारे ४५ अधिकारी गुरुवारपासून कामावर रूजू झाले.
प्रशासनाने बजावलेल्या सेवा समाप्तीच्या नोटीसला न जुमानता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी नाशिकच्या दिशेने पावले उचलली आहेत. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून हे कर्मचारी नाशिक ते मुंबई असा १८ ते २८ मे लाँग मार्च काढणार आहेत. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २५० कंत्राटी कर्मचारी रवाना झाले. ते खासगी गाड्या, रेल्वेने निघाले आहेत.
आंदोलन सुरुच
काही जिल्ह्यांमध्ये शासनाने दिलेला आदेश झुगारून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरूच ठेवल्याने त्यांची सेवा समाप्त करण्यात आली. तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी न घाबरता आंदोलन सुरू ठेवले आहे.