रत्नागिरी :फेथाई वादळी वाऱ्याचा मासेमारीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 04:23 PM2018-12-19T16:23:26+5:302018-12-19T16:24:55+5:30
सागरी मासेमारीवरील नैसर्गिक संकटांची मालिका सुरूच आहे. गोवा बंदीचे परिणाम सोसत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील सागरी मासेमारी ठप्प झाली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेथाई चक्रीवादळामुळेही सागरी क्षेत्रातील वातावरणात अचानक बदल झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाता मच्छीमारांनी बंदरांमध्येच नौका नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे मासेमारी व्यवसायाला पुन्हा मोठा फटका बसला आहे.
रत्नागिरी : सागरी मासेमारीवरील नैसर्गिक संकटांची मालिका सुरूच आहे. गोवा बंदीचे परिणाम सोसत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील सागरी मासेमारी ठप्प झाली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेथाई चक्रीवादळामुळेही सागरी क्षेत्रातील वातावरणात अचानक बदल झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाता मच्छीमारांनी बंदरांमध्येच नौका नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे मासेमारी व्यवसायाला पुन्हा मोठा फटका बसला आहे.
१ आॅगस्टपासून पारंपरिक मासेमारी, तर १ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारी सुरू झाली. मात्र, या हंगामातील सागरी मासेमारी सुरू झाल्यापासून काहीना काही नैसर्गिक आपत्तीला मच्छीमारांना सामोरे जावे लागले आहे. वादळी वाऱ्यामुळे याआधीही मासेमारी ठप्प झाली होती. त्यानंतर गोवा सरकारने मासळी आयातीवर बंदी घातल्यानेही जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
राज्यातील व परराज्यातील अन्य बाजारपेठा शोधून तेथे मासळी पाठविण्याचा पर्याय मासेमारांनी शोधलेला असतानाच गेल्या दोन दिवसांपासून सागरी क्षेत्रात वादळी वेगवान वाऱ्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाणे धोकादायक बनले आहे.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर, जयगड बंदर, हर्णै बंदर तसेच अन्य बंदरांमध्येच मासेमारी नौका नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. रत्नागिरीच्या मिरकरवाडा मासेमारी बंदरात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या संख्येमध्ये मासेमारी नौका नांगरण्यात आल्या आहेत.
वादळी वाऱ्यामुळे सागर खवळलेला असून, लाटांचा जोरही वाढलेला आहे. त्यामुळेच मच्छीमारांनी मासेमारीसाठी सागरात जाणे टाळले आहे. स्थानिक बाजारपेठांमध्ये मासळीची आवक थांबली आहे. मुंबई, अलिबाग येथून येणाऱ्या मासळीची जिल्ह्याच्या बाजारपेठांमध्ये सध्या विक्री केली जात आहे. फेथाई वादळामुळे वादळी हवामान आणखी दोन दिवस राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
पर्ससीन मासेमारीला केवळ चार महिनेच परवानगी देत अन्य कालावधीत पर्ससीन मासेमारीवर शासनाने बंदी घातली आहे. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर अशी परवानगी आहे. त्यामुळे येत्या ३१ डिसेंबरला म्हणजेच आणखी १३ दिवसांनी पर्ससीन मासेमारी बंद करावी लागणार आहे. नैसर्गिक संकटांमुळे पर्ससीन मासेमारीचा बराच कालावधी मासेमारीविना गेला आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेथाई चक्रीवादळाने आपली दिशा तामिळनाडूकडून आता आंध्रप्रदेशातील मच्छलीपटनम ते काकीनाडा दरम्यान वळवली आहे. या चक्री वादळाचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रातही दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडला आहे. किनारपट्टीवर वादळी वारेही जोरात वाहात आहेत. त्यामुळेच सागरी मासेमारीवर या वादळी वाऱ्याचे सावट पसरले आहे.