रत्नागिरी : राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मराठी रंगभूमीची एक्सपायरी डेट प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 05:15 PM2018-05-21T17:15:09+5:302018-05-21T17:15:09+5:30
तळवडे बौद्धजन सेवा संघ, मुंबई व ग्रामीण तसेच भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा, तळवडे (ता. लांजा) यांच्या विद्यमाने महामानावांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मराठी रंगभूमी, रत्नागिरीच्या एक्सपायरी डेट ने प्रथम क्रमांक पटकावला.
लांजा : तळवडे बौद्धजन सेवा संघ, मुंबई व ग्रामीण तसेच भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा, तळवडे (ता. लांजा) यांच्या विद्यमाने महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मराठी रंगभूमी, रत्नागिरीच्या एक्सपायरी डेट ने प्रथम क्रमांक पटकावला.
उत्कृष्ट नेपथ्य प्रथम क्रमांक प्रवीण धुमक, प्रकाशयोजना प्रथम क्रमांक साई शिर्सेकर, उत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय क्रमांक ओंकार पाटील, वैयक्तिक उत्कृष्ट पुरूष अभिनय प्रथम क्रमांक स्वानंद मयेकर, उत्कृष्ट स्त्री अभिनय तृतीय क्रमांक ऋचा मुकादम अशी पारितोषिके मिळवत स्पर्धेवर आपला ठसा उमटवला.
भारतीय संस्कृतीतील नीतीमूल्ये बाजूला सारून पाश्चात्य संस्कृतीचे आचरण करून मुलाने आपल्या वडिलांची निश्चित केलेली मृत्यूची वेळ व त्याची तयारी, देशप्रेमी वडिलांची मानसिकता प्रभावीपणे दाखवताना मानवी मूल्यांचे महत्व अधोरेखित करून समाजाला दिशा दाखवत ज्वलंत समस्यावर प्रकाश टाकणारी एकांकिका 'एक्सपायरी डेट'ने रसिकांच्या मनावर राज्य केले.
स्वानंद मयेकर, ऋचा मुकादम, अक्षय शिवगण, शिवानी जोशी, निशांत जाधव यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय देत एकांकिका प्रथम क्रमांकावर नेवून ठेवली. या एकांकिकेने साऱ्यांची मने जिंकली.
स्पर्धेत द्वितीय क्रमांक कला सार्थक ग्रुप, रत्नागिरीने सादर केलेली म्याडम, तर तृतीय क्रमांक माय माऊली, मुंबईने सादर केलेल्या सेल्फी एकांकिकेने मिळवला.
दिग्दर्शन प्रथम क्रमांक प्रतीक आंगणे, द्वितीय क्रमांक ओंकार पाटील, तृतीय क्रमांक मनोज भिसे, पुरूष अभिनय प्रथम क्रमांक स्वानंद मयेकर, द्वितीय क्रमांक नंदकुमार जुवेकर, तृतीय क्रमांक अनुप जाधव, स्त्री अभिनय प्रथम क्रमांक स्मितल चव्हाण, द्वितीय क्रमांक प्रतीक्षा सोनावणे, नेपथ्य द्वितीय क्रमांक चेतन घाणेकर, प्रकाशयोजना द्वितीय क्रमांक प्रतीक यशवंत, संगीत प्रथम क्रमांक गौरव बंडबे, द्वितीय क्रमांक स्नेह यश, विनोदी कलाकार निशांत जाधवची निवड करण्यात आली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रमेश कदम, सुधाकर कदम, एन. बी. कदम, शोभा कदम, अशोक कदम, भिमदास कदम व इतर सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.