रत्नागिरी : मासेमारी सुरु, पहिल्याच दिवशी अनेक नौका खोल समुद्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 04:08 PM2018-08-03T16:08:37+5:302018-08-03T16:14:16+5:30
खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात झाली असली तरी अजूनही अनेक नौका किनाऱ्यावरच नांगरावर उभ्या आहेत़ मात्र, पारंपरिक व छोटे मच्छीमार पहिल्याच दिवशी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते़
रत्नागिरी : खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात झाली असली तरी अजूनही अनेक नौका किनाऱ्यावरच नांगरावर उभ्या आहेत़ मात्र, पारंपरिक व छोटे मच्छीमार पहिल्याच दिवशी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते़
पावसाळ्यात १ जूनपासून खोल समुद्रातील मासेमारी पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून दरवर्षी देण्यात येतात़ त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी शासनाच्या मत्स्य खात्याकडून करण्यात येते. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी करणाऱ्या नौकांवर मत्स्य खात्याकडून कारवाई करण्यात येते़
मिरकरवाडा, राजिवडा, साखरतर, काळबादेवी, जयगड, साखरीनाटे, दापोली तालुक्यातील हर्णै, दाभोळ या बंदरामध्ये पर्ससीन नेट, ट्रॉलिंग व पारंपरिक मच्छीमार मोठ्या प्रमाणात आहेत़ या बंदरांवर मासेमारीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते़ पावसाळा सुरु झाल्यानंतर खोल समुद्रातील मासेमारी बंद होती़ मात्र, मासेमारीवरून दि़ १ आॅगस्टपासून बंदी उठल्याने पारंपरिक मच्छीमारांनी समुद्रात जाण्यास सुरुवात केली़
पहिल्याच दिवशी मासेमारी करून परतलेल्या नौकांना बांगडा, झिंगे अशा प्रकारचे मासे मिळाले़ मात्र, हे प्रमाण अत्यंत कमी होते़ मासेमारी सुरु झाल्याने आज राजिवडा, मिरकरवाडा, साखरतर ही बंदरे गजबजलेली होती़
मासेमारीला शुभारंभ झालेला असला तरी पर्ससीननेट, ट्रॉलिंगने मासेमारी करणाऱ्या नौका अजूनही किनाऱ्यावरच आहेत. पर्ससीननेट नौकांना १ जानेवारीपर्यंत मासेमारी करण्यावर शासनाने बंदी घातलेली आहे़ अजूनही अनेक नौका मालक मासेमारीला जाण्यासाठी तयारी करीत आहेत. मासेमारी हंगाम सुरु झाल्याने मच्छीमारांनी समाधान व्यक्त केले़