रत्नागिरी : पाच दिवसात पावणेपाच टन प्लास्टिक जप्त, सप्टेंबरपर्यंत छापासत्र बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 04:57 PM2018-07-26T16:57:08+5:302018-07-26T17:07:43+5:30
रत्नागिरी शहरात सलग पाच दिवस टाकलेल्या छाप्यात तब्बल पावणेपाच टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. मात्र, प्लास्टिक पिशव्यांसाठी पर्यायी पिशव्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची व्यापाऱ्यांची भूमिका लक्षात घेऊन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात येत्या १ सप्टेंबरपर्यंत छापासत्र बंद राहणार आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात सलग पाच दिवस टाकलेल्या छाप्यात तब्बल पावणेपाच टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये अद्याप टनावारी प्लास्टिक पिशव्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, प्लास्टिक पिशव्यांसाठी पर्यायी पिशव्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची व्यापाऱ्यांची भूमिका लक्षात घेऊन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात येत्या १ सप्टेंबरपर्यंत छापासत्र बंद राहणार आहे. हा निर्णय मंगळवारी येथे झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत आमदार उदय सामंत यांनी जाहीर केला.
रत्नागिरी शहरात टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल पावणेपाच टन प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या व वस्तू जप्त करण्यात आल्या. रत्नागिरी नगर परिषदेच्या भरारी पथकातील कर्मचारी दादागिरी करतात. प्रतिबंधित नसलेल्या प्लास्टिक पिशव्या, वस्तू जप्त करतात, अशी व्यापाऱ्यांची तक्रार होती.
याबाबत चर्चेतून निर्णय घेण्यासाठी बुधवारी दुपारी १२.३० वाजता नगर परिषदेच्या संत गाडगेबाबा सभागृहात शहरातील व्यापारी, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांची संयुक्त सभा आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाली. नगराध्यक्ष राहुल पंडित, मुख्याधिकारी अरविंद माळी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उदय पेठे व शहरातील व्यापारी उपस्थित होते.
या सभेत प्लास्टिक बंदीमध्ये नेमक्या कोणत्या वस्तू आहेत व कोणत्या नाहीत, याबाबत चित्रफीत दाखविण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शन करताना आमदार उदय सामंत म्हणाले, व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर येत्या १ सप्टेंबरपर्यंत भरारी पथकामार्फत शहरात सुरू असलेल्या छापासत्र थांबवाव्यात, अशी सूचना आपण नगर परिषदेला केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडील प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा परत करण्यास किंवा पुनर्प्रक्रियेसाठी देण्यास यामुळे अवधी मिळेल.
वेफर्स पिशव्यांची मोठी समस्या
रिसायकलेबल म्हणून वेफर्स, चिप्स व विविध खाद्यवस्तूंसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचे पर्यावरणासाठी सर्वात मोठे संकट निर्माण झाले आहे. या प्लास्टिकच्या पिशव्या रिसायकलेबल असल्या तरी त्या परत घेतल्याच जात नाहीत, त्यावर पुनर्प्रक्रियाही होत नाही. त्यामुळे या पिशव्यांचा सर्वाधिक कचरा ही मोठी समस्या बनली आहे. व्यापाऱ्यांना या नियमाची माहिती द्यावी आणि त्याची कडक अंमलबजावणी व्हावी. त्याबाबत कारवाई होणार की नाही, असा सवाल रत्नागिरीतील नागरिकांमधून केला जात आहे.
...त्या पिशव्या परत करणार
रत्नागिरी शहरात भरारी पथकाने कारवाई करताना काही व्यापाऱ्यांकडील ५० मायक्रॉनवरील पॉलिथीन पिशव्या जप्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही चुकीची कारवाई झाली आहे. त्यामुळे या पिशव्या संबंधित व्यापाऱ्यांना परत केल्या जातील, असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.