रत्नागिरी : मुरुड किनाऱ्यावर पाच समुद्री कासवे मृतावस्थेत, समुद्रातील नैसर्गिक बदलांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 05:42 PM2018-03-20T17:42:59+5:302018-03-20T17:42:59+5:30
दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी आॅलिव्ह रिडले जातीची ५ समुद्री कासवे मृतावस्थेत आढळली आहेत. या कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण कळू शकलेले नाही.
दापोली : तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी आॅलिव्ह रिडले जातीची ५ समुद्री कासवे मृतावस्थेत आढळली आहेत. या कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण कळू शकलेले नाही.
समुद्रातील नैसर्गिक बदलांचा फटका या कासवांना बसला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. मुरुड किनाऱ्यावर दुर्मीळ आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांचा मृत्यू झाल्याने दापोली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
आॅलिव्ह रिडले जातीचे समुद्री कासव जीवसृष्टीतील महत्त्वाचा दुवा समजले जाते. दापोलीतील मुरुड - कर्दे - लाडघर, कोलथरे, दाभोळ, केळशी, आंजर्ले या स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्यांवर ही कासवे अंडी घालण्यासाठी येतात. दरवर्षी किनाऱ्यावर हजारो अंड्यांचे संवर्धन करून त्यातून निघालेली पिले सुखरूप समुद्रात सोडली जातात.
दुर्मीळ होत जाणाऱ्या आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या संवर्धनाची जबाबदारी शासनाने घेतली असली तरीही मुरुड किनाऱ्यां वर मृतावस्थेत आढळलेल्या या जातीच्या कासवांमुळे शासनाच्या कासव वाचवा या मोहिमेबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे. या कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण शोधण्याची मागणी होत आहे.