Ratnagiri: राजापुरात पूर, महामार्गावर साठले पाणी
By मनोज मुळ्ये | Published: July 7, 2024 05:10 PM2024-07-07T17:10:12+5:302024-07-07T19:10:35+5:30
Ratnagiri Rain News: मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राजापूर शहरात पूर आला आहे. शनिवारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुना नदीचे पाणी जवाहर चौकात आले आहे. महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातीवले येथे पाणीच पाणी झाले आहे.
राजापूर - मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राजापूर शहरात पूर आला आहे. शनिवारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुना नदीचे पाणी जवाहर चौकात आले आहे. महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातीवले येथे पाणीच पाणी झाले आहे. महामार्गावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने अनेक ठिकाणी ही समस्या उद्भवली आहे.
गेले दोन-तीन दिवस राजापूर तालुक्यात मुसळधार पावसाने ठाण मांडले आहे. शनिवारी दिवसभर पडत असलेला पाऊस रात्रीही कायम असल्याने रविवारी सकाळी अर्जुना नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली. दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान नदीचे पाणी शहरातील जवाहर चौकात आले. पावसाचा जैर आधिक असल्याने व्यापाऱ्यांनी आधीच दुकानातील सामानाची हलवाहलवी केली.
शहरात पाणी भरत असतानाच महामार्गावरही पाणीच पाणी झाले होते. महामार्ग रुंदीकरणांमध्ये राजापूर तालुक्यातील हातीवले येथे टोल नाका उभारण्यात आला आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने पाणी साठत आहे. रविवारी दुपारच्या दरम्यान हातिवले टोलनाक्यानजीकही पाणीच पाणी झाले होते. वाहनचालकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागत होती. पावसाचा जोर कायम राहिला तर या भागातील वाहतूक काही काळ थांबवून ठेवावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.