रत्नागिरी : लांजा शहरात चार फ्लॅट फोडले, पोलिसांसमोर आव्हान, दोन ठिकाणीच चोरटे यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 04:02 PM2018-07-20T16:02:47+5:302018-07-20T16:11:03+5:30
एकाच रात्री चोरट्यांनी लांजा शहरातील कुंभारवाडी येथे असलेल्या साई समर्थ प्लाझा व राजयोग पार्क या दोन इमारतींमधील एकूण चार बंद फ्लॅट फोडले. यावेळी दोन फ्लॅटमधून २१ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरुन नेण्यास चोरटे यशस्वी झाले असले तरी राजयोग पार्कमधील फ्लॅटमध्ये काहीच हाती न लागल्याने चोरट्यांची निराशा झाली.
लांजा : एकाच रात्री चोरट्यांनी लांजा शहरातील कुंभारवाडी येथे असलेल्या साई समर्थ प्लाझा व राजयोग पार्क या दोन इमारतींमधील एकूण चार बंद फ्लॅट फोडले. यावेळी दोन फ्लॅटमधून २१ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरुन नेण्यास चोरटे यशस्वी झाले असले तरी राजयोग पार्कमधील फ्लॅटमध्ये काहीच हाती न लागल्याने चोरट्यांची निराशा झाली. ऐन पावसाळ्यात चोरांनी डोके वर काढल्याने शहरवासीय धास्तावले आहेत.
रत्नागिरी, चिपळूण, खेड येथे बंद फ्लॅट फोडून चोरीचे सत्र सुरु असतानाच मंगळवारी रात्री चोरट्यांनी लांजा शहराकडे आपला मोर्चा वळवला. या आधीही ऐन पावसाळ्यात लांजा शहरामध्ये दुकाने फोडून चोऱ्या झाल्या असल्याने शहरातील दुकानदार धास्तावले आहेत.
शहरातील कुंभारवाडी येथील साई समर्थ प्लाझा येथील दुसऱ्या मजल्यावर दिलीप काशिनाथ कशेळकर (६४) याचा बी विंगमध्ये १०४ नंबरचा फ्लॅट आहे. मंगळवारी कशेळकर हे आपल्या जुन्या घरी राहण्यासाठी सायंकाळी ७.३० वाजता गेले होते. यावेळी त्यांच्याशेजारी असलेले डॉ. अनिल कदम हेदेखील घरी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून फ्लॅटमध्ये प्रवेश केला.
यावेळी कशेळकर यांच्या घरातील कपाट फोडून त्यातील ९ हजार रुपये लंपास केले. त्यानंतर डॉ. अनिल कदम यांच्या फ्लॅटकडे चोरट्यांनी मोर्चा वळवला. कदम यांच्या घरातील १२ हजार रुपये रोख तसेच कानातील सोन्याच्या रिंग व अंगठी असा एकूण २१ हजार रुपयांचा ऐवज घेऊन जाण्यात चोरटे यशस्वी झाले.
दोन फ्लॅट फोडल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा महामार्गावर कोर्ले फाटा येथे असलेल्या राजयोग पार्क या इमारतीकडे वळवला. येथील सन इलेक्ट्रॉनिक हे दुकान फोडले. यावेळी या दुकानाच्या गल्ल्यात असलेली २०० रुपयांची चिल्लर चोरट्यांनी चोरून नेली. त्यानंतर याच बिल्डिंगमधील बी विंगमधील विश्वनाथ मांगले व शरीफ लांजेकर यांचे बंद फ्लॅट फोडले. मात्र, याठिकाणी कोणीही राहत नसल्याने चोरट्यांच्या हात हालवत माघारी फिरावे लागले.
सकाळी ७ वाजता कशेळकर व डॉ. कदम हे आपल्या फ्लॅटवर आल्यानंतर त्यांना आपले फ्लॅट फोडल्याचे दिसून आले. तसेच राजयोग पार्क इमारतीतील सन इलेक्ट्रॉनिक व अन्य दोन फ्लॅट फोडल्याचेही दिसून आले. दिलीप कशेळकर यांनी लांजा पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.
चोरीची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मारूती जगताप, पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी शांताराम पंदेरे, बळवंत शिंदे यांनी पंचनामा केला तसेच रत्नागिरी येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.
रत्नागिरीहून माही हे श्वान घेऊन सुध्देश सावंत, जीवन जाधव, चालक ए. एस. सुर्वे यांचे पथक लांजात दाखल झाले होते. यावेळी श्वानाने मुंबई - गोवा महामार्गापर्यंत चोरट्यांचा माग काढला.
भीतीचे वातावरण
यावेळी श्वान प्रथम कशेळकर यांच्या फ्लॅटनंतर डॉ. कदम यांचा फ्लॅट, त्यानंतर सन इलेक्ट्रॉनिक, राजयोग पार्कमधील बी विंगमधून सरळ महामार्गावर आले. त्यानंतर चोरट्यांनी याठिकाणाहून गाडीचा वापर केल्याचे दिसून आले. त्यापुढे श्वानाला चोरट्यांचा माग काढणे शक्य झाले नाही. या चोरीमुळे भीतीचे वातावरण आहे.