रत्नागिरी : देवरूख नगरपंचायतीच्या सहा प्रभागांमध्ये चौरंगी लढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 05:02 PM2018-03-30T17:02:50+5:302018-03-30T17:02:50+5:30
देवरुख नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगताना दिसत आहे. नगरपंचायतीची निवडणूक चौरंगी की तिरंगी होणार, याची समिकरणे मांडली जात होती. या निवडणुकीत १६ प्रभागांपैकी ६ प्रभागांमध्ये चौरंगी लढत होत आहे.
सचिन मोहिते
देवरुख : देवरुख नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगताना दिसत आहे. नगरपंचायतीची निवडणूक चौरंगी की तिरंगी होणार, याची समिकरणे मांडली जात होती. या निवडणुकीत १६ प्रभागांपैकी ६ प्रभागांमध्ये चौरंगी लढत होत आहे.
देवरुख शहरातील १६ प्रभागांपैकी ६ प्रभागांमध्ये चौरंगी लढत होत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १, ३, ७, १२, १५ व १६ यांचा समावेश आहे. तर अन्य काही प्रभागांमध्ये तिरंगी तसेच अपक्षांमुळे पंचरंगी लढती होत आहेत. प्रभाग १ मध्ये राष्ट्रवादी आघाडी, सेना, भाजप व स्वाभिमान अशी चौरंगी लढत होत आहे.
राष्ट्रवादीसाठी हा प्रभाग प्रतिष्ठेचा आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार देवेंद्र पेंढारी यांच्यासाठी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम व चिपळूणच्या सभापती पूजा निकम प्रचारात भाग घेणार आहेत. भाजप-मनसे युती आणि सेना व स्वाभिमानी अशी मते विभागली जाणार आहेत.
यापूर्वी २०१३च्या निवडणुकीत सेना व भाजप युतीला यश मिळाले होते. मात्र, यावेळी स्थिती उलट आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या देवेंद्र पेंढारी यांना विजया समीप जाणे शक्य होणार आहे. सेनेकडून प्रकाश मोरे रिंगणात असून, त्यांचाही प्रभागात दांडगा संपर्क आहे. भाजपकडून संदीप वेलवणकर व अपक्ष तथा स्वाभिमानचे संजय परकर हे प्रभाग १ मधून आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत.
प्रभाग ३ मध्ये नगरसेवक दादा शिंदे यांच्या पत्नी सुवर्णा शिंदे सेनेकडून, भाजपकडून रेश्मा किर्वे, राष्ट्रवादीकडून दीपाली करंडे तर अपक्ष श्रध्दा भोसले रिंगणात आहेत. दादा शिंदे यांचा प्रभागात संपर्क असला तरी त्यांनी गत पाच वर्षात दिलेल्या योगदानाचा विचार निवडणुकीत होणार आहे.
प्रभाग ७ हादेखील विशेष लक्षवेधी ठरणार आहे. कारण याठिकाणी भाजपला सोडचिठ्ठी देऊन सेनेत दाखल झालेले नगरसेवक दत्ताराम कांगणे सेनेतून, भाजपकडून सुशांत मुळ्ये, काँग्रेसकडून जितेंद्र भुवड आणि अपक्ष तेजश्री मुळ्ये अशी लढत होत आहे. प्रभाग १२ मध्ये सेनेकडून देवेंद्र शेट्ये, मनसेकडून सान्वी संसारे, अपक्ष सोनिया धामणस्कर आणि काँग्रेसकडून रिया शेट्ये आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत.
याखेरीज प्रभाग १५ मध्ये सेनेकडून निधी कापडी, मनसेकडून पूजा मांगले, राष्ट्रवादीकडून रुक्साना बोदले, अपक्ष प्रणाली विंचू यांच्यात लढत होत आहे. प्रभाग १६ मध्ये सेनेकडून विलास केदारी, राष्ट्रवादीकडून वसंत तावडे, भाजपकडून राजेंद्र गवंडी, अपक्ष दीपक खेडेकर हे निवडणूक रिंगणात आहेत.
आगामी निवडणुकांवर परिणाम
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहर हे तालुक्याच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. नगरपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. ही निवडणूक २०१९च्या विधानसभा निवडणुकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम करणारी ठरणार आहे.
स्वाभिमानदेखील रिंगणात
काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर मित्रपक्षांनी आघाडी केली आहे. तर शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहे. याबरोबरच भाजप व मनसे हे एकत्रित लढत असून, स्वाभिमान पक्षदेखील निवडणूक रिंगणात आहे. मात्र, पक्षाने सर्वच प्रभागांमध्ये उमेदवार न दिल्याने चौरंगी लढत होणार नाही.