रत्नागिरी -विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात
By admin | Published: September 10, 2014 10:44 PM2014-09-10T22:44:24+5:302014-09-11T00:10:49+5:30
औद्योगिक प्रशिक्षण संस्था : शिक्षकच नसल्याने उडाला गोंधळ
रत्नागिरी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राज्य शासनाच्या मान्यतेने विविध व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. त्यांचा कालावधी एक ते दोन वर्षांचा असल्याने रोजगाराची संधी उपलब्ध होईल, या आशेने विद्यार्थी प्रवेश घेतात. परंतु वर्गात शिकविण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे विद्याथीवर्गाचे भवितव्य अंधारात आहे.
शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १०९४ विद्यार्थी, तर १५० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. विविध प्रकारचे २५ अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. गोरगरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थी अभ्यासक्रम दोन वर्षांत पूर्ण झाल्यावर नोकरी, व्यवसायाची संधी उपलब्ध होईल, यासाठी औद्योगिक केंद्रात प्रशिक्षण घेतात. मात्र, काही अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाला आहे.वातानुकुलन विभागाच्या दोन तुकड्या आहेत. गतवर्षी (२०१३-१४) मध्ये दोन्ही तुकड्यांसाठी एकमेव अध्यापक अध्यापन करीत होते. मात्र, जूनमध्ये त्या अध्यापकांचीही बदली झाल्यामुळे शिक्षक उपलब्ध नाहीत. एका वरिष्ठ विद्यार्थ्याला काही दिवस शिकविण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, वैयक्तिक कारणामुळे तो विद्यार्थीही निघून गेल्याने विद्यार्थी शिक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत. जूनपासून या वर्गावर शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध नाही.
वेळोवेळी विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची भेट घेऊन शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु प्राचार्य त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार केली जात आहे. आॅगस्टपासून सुरू झालेल्या वातानुकुलनच्या वर्षामध्ये (२०१४-१५) दोन तुकड्या आहेत. एका तुकडीत २१, तर दुसऱ्या तुकडीत २६ विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी महिला अध्यापकांची निवड करण्यात आली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स अभियंता असलेल्या या अध्यापकांनी आपण केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे, परंतु प्रॅक्टीकलसाठी नकार दर्शविला आहे. परंतु यंदाचे दुसरे वर्ष असलेले वातानुकूलीनचे विद्यार्थी मात्र शिक्षकांच्या अद्यापही प्रतीक्षेत आहेत.
संबंधित विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही किंवा त्यांचे प्रॅक्टिकल झाले नाही तर दोन वर्षांनंतर संबंधित विद्यार्थ्यांना नोकरी कोण देणार? वेळोवेळी विद्यार्थी शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी करीत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
ग्रामीण भागातून अभ्यासक्रम शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे. शिक्षक उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे संबंधित बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त न करता येथेच थांबविणे गरजेचे होते. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण आहे, विद्यार्थी मानसिक दडपणाखाली वावरत असताना, त्यांची जबाबदारी कोण घेणार? पालकदेखील हैराण झाले असून, याबाबत शिक्षण संचालकाकडे तक्रार करून दाद मागणार असल्याचे या पालकांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नापास होण्याची भीती
नुकतीच या शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रथम वर्षाची परीक्षा घेण्यात आली. मात्र, अभ्यासक्रम अपूर्ण राहिला असून, प्रॅक्टिकलचा सराव नसल्याने विद्यार्थ्यांना नापास होण्याची भीती लागून राहिली आहे. अपूर्ण राहिलेल्या या अभ्यासक्रमाला जबाबदार कोण? असा सवाल आयटीआयमधील विद्यार्थी आणि पालकांमधून करण्यात येत आहे.
अध्यापकांची प्रतीक्षा
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १०९४ विद्यार्थी, तर १५० विद्यार्थिनी घेतायत प्रशिक्षण.
वातानुकूलीकरण विभागाच्या दोन तुकड्या, दोन्ही तुकड्यांसाठी एकमेव अध्यापक.
विद्यार्थ्यांच्या मागणीकडे प्राचार्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप.
शिक्षक कमी असतानाही कार्यरत शिक्षकाची बदली केल्याने संताप.
विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान.