रत्नागिरी : गोशाळांचा मंजूर निधी अडकला लालफितीत, पावसाळ्यापूर्वी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 07:06 PM2018-05-07T19:06:18+5:302018-05-07T19:08:03+5:30
खेड तालुक्यातील लोटे येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थानच्या गोशाळेला शासनाने मंजूर केलेला १ कोटीचा निधी अद्यापही न मिळाल्याने येथील ४७५ गायी व त्यांच्या वासरांच्या चाऱ्याचा व निवाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
चिपळूण : गायी थकल्या-भागल्या, अपघातात जखमी झाल्या किंवा भाकड झाल्या तर त्यांना सांभाळणे शेतकऱ्यांना कठीण होते. त्यामुळे अशा गोवंशाचे पुनर्वसन व त्यांचे पालनपोषण खेड तालुक्यातील लोटे येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थानच्या गोशाळेत केले जाते. या गोशाळेला शासनाने मंजूर केलेला १ कोटीचा निधी अद्यापही न मिळाल्याने येथील ४७५ गायी व त्यांच्या वासरांच्या चाऱ्याचा व निवाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
लोटे येथे गेल्या १० वर्षांपासून भगवान कोकरे यांनी पत्र्याच्या शेडमध्ये गोशाळा सुरु केली. या १० वर्षात अनेक भाकड गायी, अपघातग्रस्त जनावरे, शेतकऱ्यांना नको असलेली व चाऱ्या, पाण्यापासून भटकणाऱ्या जनावरांना संस्थेने स्वखर्चाने किंवा काहीवेळा शेतकऱ्यांच्या मदतीने गोशाळेत आणले. त्याठिकाणी त्यांचे संगोपन केले जावू लागले.
सुरुवातीला ही संख्या २५० पर्यंत होती. परंतु, त्यानंतर शासनाने गोशाळांना अनुदान देण्याची घोषणा केल्याने या गोशाळेची मर्यादा वाढविण्यात आली. त्यामुळे येथे आता ४७५पेक्षा जास्त गायी व त्यांची वासरे आहेत. त्यांना दररोज वैरण, चारापेंढी, ओला चारा, कडबाकुट्टी, पेंड, भुशी, पाणी द्यावे लागते.
यासाठी दिवसाला किमान १८ हजार रुपये खर्च येतो. यातील २५०पेक्षा जास्त गायींना निवाराशेड नसल्याने सध्या शेडनेट लावून त्याखाली त्यांना बांधले जाते. आता उन्हाळ्यात ही स्थिती असून, पावसाळ्यात कसे दिवस जातील, याचीच चिंता संस्थानला लागून राहिली आहे.
कोकणात मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्यात गायींच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. अशावेळी या गोवंशाचे करायचे काय? असा प्रश्न गोशाळा संचालकांसमोर आहे. पावसाळ्यापूर्वी या गोशाळेची प्रलंबित कामे पूर्ण झाली नाहीत तर या गोवंशाचे करायचे काय? त्यांना ठेवायचे कुठे? हा प्रश्न संचालकांसमोर आहे.
संस्थेचे अध्यक्ष भगवान कोकरे हे आपल्यापरीने यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असला तरी अपेक्षित यश मिळत नाही, शासनाने पावसाळ्यापूर्वी गोशाळेसाठी निधी उपलब्ध करुन येथील गोधनाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे.
दानशुरांचा आखडता हात
गायींच्या रक्षणासाठी ४० बाय १५० फुटाची शेड बांधण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी ३५ लाख रुपये खर्च येणार आहे. शासनाने मंजूर केलेल्या अनुदानापैकी अद्याप १ रुपयाही मिळालेला नाही. दानशूर व्यक्तींनीही आता शासनाकडून निधी मिळणार म्हणून हात आखडता घेतला आहे.