रत्नागिरी : प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला योग्य दर्जाची नोकरी, संजय गुप्ता यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 05:52 PM2018-11-02T17:52:18+5:302018-11-02T17:54:46+5:30
प्रकल्पग्रस्तांना योग्य प्रकारे काम देण्याची ठोस भूमिका कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. या भूमिकेची अंमलबजावणी प्रशासनाकडून लवकरच केली जाईल, असे आश्वासन रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिले आहे.
रत्नागिरी : प्रकल्पग्रस्तांना योग्य प्रकारे काम देण्याची ठोस भूमिका कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. या भूमिकेची अंमलबजावणी प्रशासनाकडून लवकरच केली जाईल, असे आश्वासन रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिले आहे.
प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी घेतली आहे. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात नीलेश राणे यांनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानुसार नीलेश राणे यांनी रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्याशी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्यासंदर्भात चर्चा केली. या चर्चेदरम्यान प्रशासनाकडूनही सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.
प्रत्येक प्रकल्पग्रस्तांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन गुप्ता यांनी दिले असून, त्याची अंमलबजावणी तत्काळ केली जाईल, असेही त्यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले.या बैठकीनंतर निलेश राणे यांनी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन केले. त्यावेळी प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला योग्य दर्जाप्रमाणे काम मिळेल. त्याप्रमाणे प्रत्येकाने कामाला सुरूवात करावी, असे सांगितले.