अन् प्रीतमच्या चेहऱ्यावर उमटले हास्य, रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनची वाढदिनी ‘अनोखी भेट’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 04:58 PM2022-05-30T16:58:37+5:302022-05-30T17:00:14+5:30
कशेळीच्या देवघळ पॉईंटवर शंभर पायऱ्यांवरून व्हीलचेअरद्वारे खाली न्यायचे आणि पुन्हा वर आणायचे हे एक दिव्यच होते.
रत्नागिरी : सर्वसामान्य आणि धडधाकट माणूस कुठेही, कधीही फिरायला जाऊ शकतो. मात्र, पर्यटनाच्या आनंदापासून दिव्यांग व्यक्ती वंचित राहतात. त्यांना टीव्ही, मोबाईलवर शूटिंग पाहून किंवा छायाचित्रे पाहून आनंद घ्यावा लागतो. उंच डोंगरावरून दिसणारा अथांग समुद्र, वारा आणि निळे आकाश पाहण्याची ‘अनोखी भेट’ रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने प्रीतम उदय कदम या सदस्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त दिले.
प्रीतमच्या वाढदिवसाला कशेळीच्या देवघळ पॉईंटवर व्हीलचेअरवरून पायऱ्या उतरून नेण्यात आले. त्याला नेताना हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची काही प्रमाणात दमछाक झाली. मात्र, या पॉईंटवर पोहोचल्यावर प्रीतमच्या चेहेऱ्यावरील आनंद पाहून सदस्यांचा थकवा कुठल्या कुठे निघून गेला.
सेरेब्रल पाल्सी आजार असलेल्या प्रीतमच्या मेंदूवर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली असून, कमरेखाली अपंग असल्याने व्हीलचेअरमुळे तो फिरतो. प्रीतमने दहावी, बारावीचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला घरात असणाऱ्या प्रीतमला रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी त्याला स्वावलंबी होण्यासाठी मदत केली. त्याचा आत्मविश्वास वाढला. प्रीतम पानपट्टी चालवितो. आजारपणामुळे प्रीतम कुठेही पर्यटनाला जाऊ शकलेला नसल्याचे कळल्यावर रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रीतमचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले.
वाढदिवसादिवशी प्रीतमला कशेळी गावी नेण्यात आले. तेथील अथांग समुद्र, किनाऱ्यावर येताना फेसाळणाऱ्या लाटा आणि त्याचे विराट रूप पाहून प्रीतम हरकला. शंभर पायऱ्यांवरून व्हीलचेअरद्वारे खाली न्यायचे आणि पुन्हा वर आणायचे हे एक दिव्यच होते. परंतु, सादिक यांचे भाऊ समीर नाकाडे यांनी ही जबाबदारी पार पाडली. प्रीतमसोबत प्रिया बेर्डे, कशेळीतील तेजस फोडकर, त्याचा मित्र श्रीपाद पाटील मदतीला होते.
देवघळ पॉईंटवरून दिसणारे विलोभनीय दृश्य पाहून प्रीतम आनंदला. दोन्ही बाजूला डोंगरदऱ्या आणि मधल्या भागातील समुद्र व हे सृष्टीसौंदर्य पाहण्यासाठी कशेळी ग्रामपंचायतीने केलेल्या सुविधेचा लाभ झाल्याचे प्रीतमने सांगितले. दिव्यांगांकरिता नेहमीच कार्यरत व मदतीसाठी तत्पर असणाऱ्या रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे दिलेल्या अनोख्या भेटीबद्दल प्रीतमने कृतज्ञता व्यक्त केली.