रत्नागिरी : थकलेल्या हातातही रंगांच्या जादूची ताकद, सागवेकर यांच्या हातांना लाभली कलेची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 04:50 PM2018-09-11T16:50:34+5:302018-09-11T16:54:32+5:30
प्रत्येक व्यक्तीच्या हातात कला असतेच असे नाही. ती एक दैवी देणगीच असते. अशीच अद्भूत कला रत्नागिरीतील ८५ वर्षीय चित्रमहर्षी शांताराम (भाऊ) शंकर सागवेकर यांच्या कुंचल्यात आहे. आत्तापर्यंत त्यांच्या या कुंचल्यातून जलरंगातील, तैलरंगातील तसेच चारकोल पावडरच्या माध्यमातून शेकडो विविध प्रकारची चित्रे साकार झाली आहेत.
शोभना कांबळे
रत्नागिरी : प्रत्येक व्यक्तीच्या हातात कला असतेच असे नाही. ती एक दैवी देणगीच असते. अशीच अद्भूत कलारत्नागिरीतील ८५ वर्षीय चित्रमहर्षी शांताराम (भाऊ) शंकर सागवेकर यांच्या कुंचल्यात आहे. आत्तापर्यंत त्यांच्या या कुंचल्यातून जलरंगातील, तैलरंगातील तसेच चारकोल पावडरच्या माध्यमातून शेकडो विविध प्रकारची चित्रे साकार झाली आहेत.
रत्नागिरी शहरातील हिंदू कॉलनी येथे राहणारे शांताराम तथा भाऊ सागवेकर यांचे वडील शंकर सागवेकर सुवर्णकार व्यवसायासाठी मुंबईत गेल्याने पुढे शांताराम सागवेकर यांचे शिक्षणही तिथेच झाले. भाऊंना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. अनेक स्पर्धांमध्येही त्यांना प्रथम क्रमांक मिळाले होते. त्यांनी जे. जे. स्कूल आॅफ आर्टमध्ये शिक्षण घेण्याचा हट्टच धरला.
वडिलांनी त्याला तेवढाच कट्टर विरोध दर्शविला. मात्र, नंतर त्यांनी त्याला परवानगी दिली. पुढे याच कॉलेजमधून भाऊंनी चित्रकलेतील डीटीसी ही पदविका घेतली. त्यात महाराष्ट्रात ते प्रथम श्रेणीत सर्वप्रथम आले. त्यामुळे थोड्याच दिवसात त्यांना मुंबईतील सायन येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कलाशिक्षक म्हणून नोकरी मिळाली. या शाळेत त्यांनी १९५६ ते १९९२ या कालावधीत सेवा केली.
या कालावधीत त्यांचे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन लाभल्याने शाळेने चित्रकला स्पर्धा, परीक्षा व प्रदर्शने यात पारितोषिके मिळवत शान वाढवली. याचबरोबर मुंबईचे लोकप्रिय दैवत लालबागचा राजा तसेच इतर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सजावटीत विविध चलचित्र देखावे, करून आपल्या कलेचा डंका सर्वत्र पोहोचवला. यातूनच त्यांचा लोकसंपर्कही अधिक वाढल्याने त्यांच्या कलेला अधिकच मागणी वाढली.
चारकोल पावडरपासून हाताच्या फटकाऱ्याने व्यक्तिचित्रण हे तर त्यांचे खास वैशिष्ट्य होते. रत्नागिरीत आल्यानंतर त्यांची कला अधिकच मुक्तपणे बहरली. व्यक्तिचित्रणात त्यांचा हातखंडा होताच. त्यामुळे त्यांच्या या अप्रतिम चित्रांना मागणी वाढली.
त्यांना लहानपणापासून अध्यात्माची आवड होतीच. या आवडीतूनच त्यांनी संतांचे दर्शन समाजाला व्हावे, नवीन पिढीला त्यांच्याविषयी माहिती व्हावी, यासाठी संतप्रदर्शन भरविण्याचे स्वप्न पाहिले. त्यादृष्टीने त्यांची व्यक्तिचित्र रेखाटण्यास सुरूवात केली. २००९मध्ये त्यांचे हे स्वप्न मूर्त स्वरूपात साकारही झाले. वयाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने वयाच्या अमृत महोत्सवानिमित्त रत्नागिरीतील गोदुताई जांभेकर विद्यालयात त्यांच्या या संतदर्शन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
अनेक पुरस्कारांचे मानकरी
भाऊंच्या दैवी कलेची दखल घेऊन त्यांना मुंबई पोलीस मित्र पुरस्कार मिळाला असून, जे. जे. रूग्णालयाचे निवृत्त डीन डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कारही देण्यात आला आहे.
साहित्यिक कार्य
भाऊंनी रत्नागिरी तसेच मुंबई येथील वृत्तपत्रांतून प्रबोधनात्मक लेखमाला लिहिली आहे. विश्वकर्मा पांचाल मासिकाच्या १९९५ ते १९९९ या सलग पाचही वर्षांच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाला मानकरी पुरस्कार मिळालेला आहे. जय भगवान, संस्कार, संस्कृती पूजन, सचित्र कचरनाथ गाथा, अंत्येष्टी संस्कार आदी आध्यात्मिक लेखन भाऊंनी केले असून, आजही ते करत आहेत.
पत्नीचीही मोठी साथ
कुठल्याही कलेशी तदरूपता असेल तरंच त्यातून सुंदर कलाकृती निर्माण होते. माझ्या कलेशी मी एकरूप झाल्यानेच माझ्या हातून एवढे कार्य घडले. माझ्या या कार्यात माझ्या पत्नी सुरेखा हिची साथ ही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळेच आताही माझ्या हातून अध्यात्मिक कार्य घडत असल्याचे चित्रमहर्षी शांताराम तथा भाऊ सागवेकर सांगतात.
अमेरिका, इंग्लंडमध्येही लोकप्रियता
भाऊ सागवेकर यांनी अवघ्या सिनेरसिकांना वेड लावणाऱ्या मुघले आझम आणि पाकिजा या चित्रपटांमधून आपल्या चित्रकलेचे कसब दाखवले आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सवात केलेल्या सजावटींनी अनेकांना मंत्रमुग्ध केले आहे. एवढेच नव्हे तर अमेरिका, इंग्लंडमध्येही त्यांच्या चित्रांनी लोकप्रियता मिळवली आहे.
अश्वारूढ शिवस्मारकाची प्रतिकृती
रत्नागिरीचे भूषण असलेल्या मारूती मंदिर येथील अश्वारूढ शिवस्मारकाचीही भाऊंनी हुबेहूब प्रतिकृती साकारली. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा कटआऊट तसेच प्लायवूडच्या सहाय्याने त्यांनी ही प्रतिकृती साकारली आहे.
वर्षभर अहोरात्र परिश्रम घेऊन चित्रे पूर्ण
भक्तीचा मार्ग दाखवतो तो संत. म्हणूनच या संतांचे दर्शन समाजाला घडविण्यासाठी २००९ साली त्यांच्या वयाच्या अमृत महोत्सवानिमित्त तीन दिवसांचे संतदर्शन हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यात भाऊंनी आपल्या कुंचल्यातून गणपती, सरस्वती, दत्त यांच्यासह स्वामी समर्थ, गुळवणी महाराज, गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज, स्वामी स्वरूपानंद, गाडगेबाबा, साईबाबा, कचरनाथ स्वामी आदी २४ संताचे रेखाटन केले होते. यासाठी झालेला खर्च त्यांनी स्वत:च्या निवृत्तीवेतनातून केला. वर्षभर अहोरात्र परिश्रम घेऊन त्यांनी ही चित्रे पूर्ण केली.
सामाजिक व अध्यात्मिक कार्य
|
भाऊ सागवेकर यांनी आपल्या कुंचल्याच्या असामान्य अशा ताकदीचा वापर करून चित्रांच्या तसेच रांगोळीच्या माध्यमातून व्यसनाधीनता, दारूमुक्ती, संतदर्शन आदींचे प्रदर्शन आयोजित करून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. अनेक ग्रामीण भागात दहावीच्या मुलांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली आहेत. गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या - पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले आहे. आताही त्यांचे अध्यात्मिक कार्य कचरनाथ स्वामींच्या मंदिर स्थापनेपासून रत्नागिरीतही सुरू आहे.
अन् उद्धव ठाकरेही भारावले...
शिवसेनाप्रमुख स्व. बाळ ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचेही चित्र भाऊंनी रेखाटले. रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम आयोजित केला होता, यावेळी ही तसबीर त्यांना देण्याकरिता भाऊ सागवेकर तिथे गेले. मात्र, एवढ्या गर्दीत जाणे शक्य नसल्याचे ओळखून त्यावेळी कर्तव्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या तत्कालिन पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी त्यांना उद्धव ठाकरेंच्या गाडीजवळच उभे राहण्यास सांगितले. काही वेळातच ठाकरे बाहेर आले. त्यावेळी भाऊंनी त्यांना ती तसबीर भेट दिली. ती प्रतिमा पाहून उद्धव ठाकरेही भारावले होते.