रत्नागिरी : पर्यटकांना सवलतींची खूश खबर! पर्यटन वाढीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 03:56 PM2018-12-19T15:56:54+5:302018-12-19T15:59:39+5:30
रत्नागिरी जिल्ह्याची ओळख प्रामुख्याने पर्यटनासाठी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करून घेऊ लागले आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. कोकणात सर्व प्रकारचे पर्यटक आकर्षित व्हावेत, या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने विशिष्ट प्रकारच्या पर्यटकांबरोबरच अन्य पर्यटकांसाठीही अनेक सवलतींच्या योजना जाहीर केल्या आहेत.
शोभना कांबळे
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याची ओळख प्रामुख्याने पर्यटनासाठी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करून घेऊ लागले आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. कोकणात सर्व प्रकारचे पर्यटक आकर्षित व्हावेत, या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने विशिष्ट प्रकारच्या पर्यटकांबरोबरच अन्य पर्यटकांसाठीही अनेक सवलतींच्या योजना जाहीर केल्या आहेत.
पर्यटनाला व्यावसायिकतेची जोड देऊन पर्यटन व्यवसाय पर्यायाने रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्याकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटकन विकास महामंडळाने निवासस्थाने उपलब्ध करून दिली आहेत.
पर्यटन विकास महामंडळाच्या रिसोर्टला पर्यटकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने नेहमीच ही भरलेली असतात. पर्यटकांची निराशा टाळण्यासाठी खासगी हॉटेल्सबरोबर खासगी व्यावसायिकांसाठी निवास न्याहरी योजनाही राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या व्यावसायिकांची सुमारे ३५० इतकी संख्या आहे.
गणपतीपुळे आणि वेळणेश्वर येथील सागरी किनाऱ्यांवर निवास व्यवस्थेबरोबरच पर्यटन केंद्रही विकसित करण्यात आले आहे. दरवर्षी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना लाखो पर्यटक भेट देत आहेत. बीच फेस्टिवलसारखे उपक्रम राबविण्यात येत असल्याने तर गेल्या चार पाच वर्षात जिल्ह्यात येणाऱ्या देशी - विदेशी पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
विविध प्रकारच्या पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घ्यावा, या उद्देशाने पर्यटन महामंडळाने माजी सैनिक, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, शासकीय कर्मचारी तसेच अन्य पर्यटकांसाठीही विविध सवलतींच्या योजना जाहीर केल्या आहेत. पर्यटक वाढावेत, या उद्देशाने पर्यटन निवासाच्या दरातही कपात केली आहे. पर्यटन हंगामाबरोबरच बिगर पर्यटन हंगामातही ही संधी पर्यटकांना मिळणार आहे.
पर्यटक निवासात थेट येणाऱ्या पर्यटकांना खोल्यांच्या दरात २५ टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासात रिकाम्या असलेल्या खोल्यांपैकी ५० टक्के खोल्यांवर २५ टक्के दराने सूट देण्यात येते. मात्र, या सवलती घेणाऱ्या पर्यटकांना इतर विशिष्ट घटकांसाठी उदा. ज्येष्ठ नागरिक अपंग आदींसाठी असलेल्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही.
पर्यटनाचा आनंद विविध प्रकारच्या दिव्यांग व्यक्तिंनाही घेता यावा, या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने अशा व्यक्तींसाठी पर्यटन निवासाच्या दरात सवलत ठेवली आहे. त्यांच्यासाठी एका कक्षाच्या आरक्षणावर सर्व हंगामात २० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही सवलत ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्यांसाठी दिली जाणार आहे. त्याकरिता या लाभार्थ्यांंना तसे अपंगत्त्वाचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. या योजनेमुळे अशा दिव्यांग व्यक्तींही पर्यटनाचा लाभ घेत आहेत.
समुहाने येणाऱ्या पर्यटकांसाठीही पर्यटन विकास महामंडळाकडून मोठ्या प्रमाणावर सवलत देण्यात येते. त्यानुसार गणपतीपुळेसारख्या मोठ्या रिसोर्टमध्ये २० किंवा त्यापेक्षा अधिक खोल्यांच्या आरक्षणावर २० टक्के सवलत देण्यात येते. तसेच वेळणेश्वरसारख्या छोट्या रिसोर्टवर पाच किंवा त्यापेक्षा अधिक खोल्यांच्या आरक्षणावरही २० टक्के सवलत देण्यात येते. या सर्व सवलतींची माहिती महामंडळाने स्वतंत्र सुरू केलेल्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने भारतीय सैन्य दलातील माजी सैनिकांसाठीही सवलत योजना लागू केली आहे. त्यांच्यासाठी पर्यटक निवासाच्या दरात सवलत ठेवली आहे. माजी सैनिकांसाठी सर्व हंगामात २० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही सवलत एका कक्षाच्या आरक्षणावर लागू राहणार आहे.
देशात येणाऱ्या अनिवासी भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीही पर्यटन महामंडळाने विविध सवलती देवू केल्या आहेत. त्यायोगे एमटीडीसीच्या पर्यटक निवासामध्ये एका कक्षासाठी १० टक्के सवलत ठेवण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी अशांना पासपोर्टची छायांकित प्रत सादर करावी लागते. या सवलतीचा लाभ जिल्ह्यातील गणपतीपुळे, वेळणेश्वर आदी ठिकाणी हे पर्यटक घेत आहेत.
पर्यटन महामंडळाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र दर्शन सवलत योजनेंतर्गत प्रवास करणाऱ्या शासकीय कर्मचारी यांच्यासाठीही महामंडळाकडून सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एका कक्षाच्या आरक्षणावर हंगामात १० टक्के सवलत देण्यात येत आहे. तसेच बिगर हंगामात २० टक्के सवलत देण्यात येत आहे. या आकर्षक योजनेमुळे आता शासकीय कर्मचारीही या सवलतीचा लाभ घेत आहेत.